*बुलढाणा ब्रेकिंग*
*निवडणूक याचिका फेटाळण्यासाठी आ. संजय गायकवाड, आ. संजय कुटे यांचे उच्च न्यायालयात अर्ज.*
*22 ऑगस्ट रोजी अंतिम सुनावणी.*
बुलढाणा मतदार संघातील शिवसेना शिंदे गटाचे आ. संजय गायकवाड व जळगाव जामोद मतदारसंघातील भाजपा आ. संजय कुटे यांनी त्यांच्या निवडीविरुद्ध दाखल असलेली निवडणूक याचिका फेटाळण्यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे अर्ज केले आहे. यावर याचिका कर्त्यांना 15 ऑगस्ट पर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहे. या संपूर्ण प्रकरणावर 22 ऑगस्ट रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. बुलढाण्यातून महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवार जयश्री शेळके ( उबाठा ) यांनी आ.संजय गायकवाड तर जळगाव जामोद मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवार डॉ. स्वाती वाकेकर (काँग्रेस) यांनी भाजप आ. संजय कुटे यांची निवड रद्द करण्याची मागणी निवडणूक याचिकेद्वारे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात केली आहे. त्यावर निवडणूक जिंकलेल्या संजय गायकवाड व संजय कुटे यांनी ही याचिका रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केले आहे. या आमदारांनी निवडणूक याचिकांना दिवाणी प्रक्रिया संहितेतील सातव्या ऑर्डर मधील नियम 11 आणि लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 86 (6)अंतर्गत विरोध केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची अंतिम सुनावणी 22 ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात होणार आहे.

