-
- *जानेफळ-पारडी घुटी मार्गावरील पुलाला भगदाड; मोठ्या अपघाताची भीती, प्रशासन ढिम्म!…*
जानेफळ
ग्रामीण भागातील रस्ते आणि पुलांच्या दुरवस्थेकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष आता प्रवाशांच्या जीवावर बेतू लागले आहे. जानेफळ जवळील पारडी घुटी येथील नाल्यावरील पुलाला मोठे भगदाड पडले असून, या ठिकाणी कधीही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, इतकी गंभीर परिस्थिती असतानाही संबंधित प्रशासन मात्र सुस्त असल्याचे पाहायला मिळत आहे.
यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे या नाल्याला मोठा पूर आला होता. पावसाच्या प्रवाहामुळे पुलावरील स्लॅबचा काही भाग वाहून गेला असून पुलाचे नळकांडे पूर्णपणे उघडे पडले आहेत. पुलाच्या मधोमध पडलेल्या या मोठ्या भगदाडामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी तर या ठिकाणी भीषण अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
ग्रामीण भागातील जनतेच्या सोयीसुविधांकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. “प्रशासन एखाद्या मोठ्या बळीची वाट पाहत आहे का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी पारडी घुटी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी हा मुख्य रस्ता आहे. पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, तातडीने दुरुस्ती न केल्यास हा मार्ग पूर्णपणे बंद पडू शकतो. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुलाचे काम त्वरित पूर्ण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.



