बुलढाणा
*सिंदखेडराजा : जिजाऊ जन्मोत्सवाची भव्य तयारी अंतिम टप्प्यात…*
*राजवाड्यावर आकर्षिक विद्युत रोषणाई…*
राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेब यांच्या ४२८ व्या जयंतीनिमित्त मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे भव्य आणि ऐतिहासिक वातावरण निर्माण झाले आहे. राजमाता जिजाऊ साहेबांचे जन्मस्थळ असलेला श्री लखुजीराजे जाधव राजवाडा आणि संपूर्ण जिजाऊ सृष्टी परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसर अलौकिक व भक्तिमय वातावरण निर्माण करत आहे.
दिनांक १२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त दिवसभर विविध धार्मिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातून लाखो जिजाऊ भक्त सिंदखेडराजाकडे येण्याची शक्यता असल्याने प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्था सज्ज झाल्या आहेत. या पवित्र प्रसंगी पालकमंत्री मकरंद पाटील, कामगार मंत्री आकाश फुंडकर, सहपालकमंत्री संजय सावकारे,
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव
हे सर्व मान्यवर जिजाऊ जन्मस्थळी भेट देऊन अभिवादन करणार आहेत. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने
अभिषेक, महाआरती
कीर्तन, पोवाडे, व्याख्याने
महिला सशक्तीकरण व राष्ट्रभक्तीवर आधारित कार्यक्रम
अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता वाहतूक नियंत्रण, पार्किंग व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता, वैद्यकीय सुविधा व सुरक्षेच्या दृष्टीने विशेष नियोजन करण्यात आले आहे. पोलिस बंदोबस्तही कडक ठेवण्यात आला आहे.
जिजाऊ साहेबांचे विचार, त्यांचे संस्कार आणि त्यांनी घडवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा उत्सव असल्याने हा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक आणि राष्ट्रीय प्रेरणेचा महोत्सव ठरत आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या या जिजाऊ जन्मोत्सवामुळे सिंदखेडराजा हे मातृशक्ती, राष्ट्रनिर्मिती आणि संस्कारांचे केंद्र बनले असून — जिजाऊंच्या विचारांनी भारलेले वातावरण अनुभवण्यासाठी लाखो भक्त येथे दाखल होत आहेत….



