मुंबई
*राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निकालांकडे देशाचे लक्ष;…*
*भविष्यात बॅलेट पेपरद्वारे निवडणुकांची जनतेकडून मागणी…*

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्राकडे लागले आहे. या निकालांचा परिणाम केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांपुरता मर्यादित न राहता आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या राजकीय दिशेवरही प्रभाव टाकणारा ठरणार असल्याने राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता आहे….
दरम्यान, या निवडणुकांच्या अनुषंगाने ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) बाबत पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. भविष्यात होणाऱ्या सर्व निवडणुका ईव्हीएम मशीनशिवाय पारंपरिक बॅलेट पेपरद्वारेच घ्याव्यात अशी मागणी आता जनसामान्यांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे.
ईव्हीएममध्ये घोळ होण्याची शक्यता, पारदर्शकतेचा अभाव आणि सर्वसामान्य मतदारांचा मशीनवरील विश्वास कमी होत चालल्याचा दावा नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व काही राजकीय संघटनांकडून करण्यात येत आहे. “मतदान प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक, विश्वासार्ह आणि सर्वसामान्य मतदाराला समजणारी असावी,” अशी भावना व्यक्त होत असून त्यासाठी बॅलेट पेपर हाच एकमेव विश्वासार्ह पर्याय असल्याचे मत मांडले जात आहे….
काही नागरिकांनी असेही मत व्यक्त केले की, लोकशाहीचा पाया असलेल्या मतदान प्रक्रियेत जनतेचा विश्वास सर्वात महत्त्वाचा आहे. जर मतदारांचा विश्वास डळमळीत होत असेल तर त्यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे….
दरम्यान, निवडणूक आयोगाकडून मात्र ईव्हीएम प्रणाली सुरक्षित, अचूक व पारदर्शक असल्याचे वारंवार स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही जनतेतील शंका दूर करण्यासाठी अधिक पारदर्शकता आणि संवाद आवश्यक असल्याची मागणी पुढे येत आहे….
एकूणच 29 महानगरपालिकांच्या निकालांबरोबरच राज्यातील आणि देशातील निवडणूक पद्धतीवर नव्याने चर्चा सुरू झाली असून येणाऱ्या काळात हा मुद्दा अधिक गाजण्याची चिन्हे आहेत….



