बुलढाणा
*“खडकपूर्णा धरण साक्षीदार ठरले… स्व. अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विसर्जन; लाखो अश्रूंमध्ये अखेरचा निरोप”…*
बुलढाणा जिल्ह्यासाठी शोक आणि भावनिक क्षणांचा साक्षीदार ठरलेला दिवस…
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अस्थींचे आज देऊळगावराजा तालुक्यातील खडकपूर्णा धरणात विधीवत विसर्जन करण्यात आले. लाखो जनसमुदायाच्या उपस्थितीत, डोळ्यांत अश्रू आणि मनात आठवणी घेऊन जिल्हावासीयांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला….
गेल्या दोन दिवसांपासून स्व. अजितदादा पवार यांच्या अस्थी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. ग्रामीण असो वा शहरी भाग, प्रत्येक ठिकाणी जनसागर उसळलेला दिसून आला. नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी, महिलांनी, वृद्धांनी आणि युवकांनी साश्रू नयनांनी आपल्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली…..
ही अस्थी आमदार मनोज कायंदे यांनी स्वतः पुढाकार घेऊन जिल्ह्यात आणल्या होत्या, जेणेकरून जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला आपल्या नेत्याचे अंतिम दर्शन घेता यावे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात फिरवलेल्या या अस्थींना लाखो लोकांनी नतमस्तक होऊन वंदन केले…..
अखेर आज खडकपूर्णा धरणात बोटीच्या साहाय्याने स्व. अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. हा क्षण अत्यंत भावनिक ठरला. विसर्जनावेळी आमदार मनोज कायंदे भाऊक झाले, तर उपस्थितांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले…..
यावेळी जिल्हाध्यक्ष नाझेर काझी, माजी आमदार राजेंद्र शिंगणे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…..
यावेळी बोलताना अनेकांच्या भावना दाटून आल्या.
आमदार मनोज कायंदे यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात जरी काँग्रेसमधून झाली असली, तरी त्यांना विधानसभेत पाठवण्याची संधी फक्त आणि फक्त अजितदादा पवार यांनीच दिली होती. त्यामुळे “आज माझा राजकीय पाठीराखा, मार्गदर्शक आणि आधारवड हरपला,” अशी भावना त्यांच्या डोळ्यांतून स्पष्टपणे दिसत होती.
स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाने बुलढाणा जिल्ह्याने एक लोकनेतृत्व, मार्गदर्शक आणि सामान्य माणसाचा आवाज गमावला आहे.
आज खडकपूर्णा धरणाच्या शांत पाण्यात त्यांच्या अस्थी विसर्जित झाल्या असल्या, तरी त्यांच्या आठवणी, कार्य आणि संघर्ष बुलढाणा जिल्ह्याच्या जनमानसात कायम जिवंत राहतील, अशा शब्दांत नागरिकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली…..



