चोरीला गेलेल्या सायकलीनंतरही न थांबला खेळाचा प्रवास — आमदार संजय गायकवाड यांच्याकडून विद्यार्थिनीला तात्काळ नवी सायकल भेट….
मानवतेचा जिवंत प्रत्यय; हँडबॉलपटू कु. खुशी गायकवाड हिच्या डोळ्यांत आनंदाश्रू…..
बुलढाणा
सागवन येथील प्रबोधन विद्यालयात शिक्षण घेणारी आणि हँडबॉल खेळाची आवड जपणारी विद्यार्थिनी कु. खुशी दत्ता गायकवाड हिची सायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने तिच्या शिक्षण व सरावावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. जिजामाता प्रेक्षागार येथे सरावासाठी गेलेली असताना घडलेल्या या प्रकारामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या तिच्या कुटुंबासमोर मोठे संकट उभे राहिले होते.
घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने नवी सायकल घेणे शक्य नसल्याने खुशीने बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालयात धाव घेत आपली व्यथा मांडली.
विद्यार्थिनीची संपूर्ण हकीकत शांतपणे ऐकल्यानंतर आमदार गायकवाड यांनी क्षणाचाही विलंब न करता तिला नव्या सायकलीची व्यवस्था करून दिली. शिक्षण आणि खेळ यामध्ये खंड पडू नये या भावनेतून त्यांनी तत्काळ मदतीचा हात पुढे केल्याने मानवतेचा जिवंत प्रत्यय आला.
नवी सायकल मिळताच कु. खुशीच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले. “मी तुमचे उपकार कधीही फेडू शकणार नाही. जेव्हा कुणीही पाठीशी उभे राहू शकत नाही, त्या वेळी तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात,” अशा शब्दांत तिने आमदार गायकवाड यांचे आभार व्यक्त केले.
या प्रसंगी शिवसेना शिवदूत तालुकाप्रमुख नितीन राजपूत, अजय खोत, श्रीकांत शिरसाट यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी तसेच खुशीचे नातेवाईक उपस्थित होते.
गरजू विद्यार्थिनीच्या मदतीसाठी पुढाकार घेत मानवतेचा आदर्श निर्माण केल्याबद्दल परिसरातून आमदार संजय गायकवाड यांचे कौतुक होत आहे.



