बुलढाणा
*न्यायप्रक्रियेला डिजिटल गती — बुलढाण्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कक्षाचे उद्घाटन..*
*बंद्यांची हजेरी व साक्षीदारांची साक्ष आता ऑनलाईन; वेळ व खर्चाची मोठी बचत होणार…*
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा येथे अत्याधुनिक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कक्षाचे उद्घाटन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात या सुविधेचे लोकार्पण करण्यात आले.
या नव्या कक्षाच्या माध्यमातून कारागृहात बंदिस्त असलेल्या बंद्यांशी न्यायालयाचा थेट संपर्क साधणे तसेच तालुकास्तरीय न्यायालयात उपस्थित असलेल्या साक्षीदारांची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदविणे शक्य होणार आहे. यामुळे न्यायालयीन प्रक्रियेला गती मिळणार असून वेळ आणि खर्चाची बचत होण्यास मोठी मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी किरण पाटील, बुलढाणा वकिल संघाचे अध्यक्ष विजय सावळे, जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, विधीज्ञ डॉ. लता बाहेकर तसेच न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव नितीन एन. पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. या नव्या डिजिटल सुविधेमुळे जिल्ह्यातील न्यायव्यवस्था अधिक सक्षम व वेगवान होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



