बुलढाणा
*कडेकोट बंदोबस्तात पारदर्शकतेची खात्री, बुलढाणा जिल्ह्यात बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात सुरू*
*प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही देखरेख; पोलीस प्रशासनाचा कडक पहारा — विद्यार्थ्यांकडून शिस्तबद्ध सहभाग..*
बुलढाणा जिल्ह्यात उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त वातावरणात सुरळीतपणे सुरू झाल्या असून प्रशासनाने यासाठी कडेकोट उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली असून पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी शिक्षण विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तरित्या नियोजन केले आहे. परीक्षा केंद्रांच्या परिसरात सतत देखरेख ठेवली जात असून बाहेरील व्यक्तींना प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच उड्डाण पथकांकडूनही वेळोवेळी तपासणी करण्यात येत असल्याने कॉपीला आळा बसण्यास मदत होत आहे.
विद्यार्थ्यांनीही शिस्तबद्ध पद्धतीने परीक्षेला हजेरी लावली असून शांत, सुरक्षित आणि कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा देत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. प्रशासनाच्या या उपाययोजनांमुळे परीक्षा प्रक्रियेबाबत पारदर्शकता आणि विश्वास वाढला असून पालकांकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे… दरम्यान, परीक्षा काळात वाहतूक व सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती दक्षता घेतली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले असून आगामी पेपरही अशाच सुरळीत वातावरणात पार पडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



