बुलढाणा ब्रेकिंग
*कलाकारांच्या मागण्यांसाठी आमरण उपोषण चौथ्या दिवशी — आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी..*
*शासकीय मदतीअभावी कलाकारांचे जीवनमान खालावल्याचा आरोप; …*
*लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा..*
अँकर
कलाकारांच्या विविध मागण्यांसाठी सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण चौथ्या दिवशीही सुरू असून कलाकारांनी शासनाकडे तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे. कला क्षेत्र व्यापक झाले असले तरी कलाकारांसाठी ठोस शासकीय योजना किंवा आर्थिक सहाय्य उपलब्ध नसल्याने त्यांचे जीवनमान मोठ्या प्रमाणात खालावल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे…कलाकारांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वतंत्र कलाकार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. शासनाने कलाकारांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांच्या कल्याणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली… उपोषणकर्त्यांनी सांगितले की, ताजुद्दीन बाबा यांसारखे अनेक कलावंत कीर्तन करताना निधन पावले, परंतु त्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळालेली नाही. अनेक कलाकार रस्त्यावर किंवा रंगमंचावर काम करताना मृत्यूमुखी पडतात, तरीही त्यांच्या कुटुंबियांना कोणतेही संरक्षण किंवा मदत दिली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या उपोषणावेळी संबंधितांकडून आश्वासन देण्यात आले होते, मात्र अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही, असा आरोपही करण्यात आला. कलाकारांच्या प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन लेखी आश्वासन द्यावे, अन्यथा उपोषण सुरूच ठेवण्यात येईल, असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.



