बुलढाणा ब्रेकिंग
*बुलढाणा बायपास–राजूर घाट रस्त्याच्या बायबॅक प्रक्रियेला गती; केंद्राकडून सकारात्मक हालचाली..*
*आ संजय गायकवाड यांची माहिती..*
वाहतुकीची वाढलेली गर्दी आणि रस्त्याची झालेली दुरवस्था लक्षात घेता बुलढाणा शहर बायपास ते राजूर घाट मार्गाच्या बायबॅक प्रक्रियेला गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. हा मार्ग बीओटी तत्त्वावर असून करारानुसार 2036 पर्यंत खासगी ताब्यात राहणार होता. त्यामुळे शासनाने बायबॅकची रक्कम भरल्याशिवाय दुरुस्ती किंवा पुढील कामे शक्य नव्हती, अशी भूमिका यापूर्वी केंद्राकडून कळविण्यात आली होती.
या प्रकल्पासाठी सुमारे साडेबाराशे कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली होती. मात्र राज्यातील एकूण 28 प्रकल्पांसाठी बायबॅकची रक्कम भरण्याची आर्थिक अडचण असल्याने राज्य शासनाला निधी उभारता येत नव्हता…
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत हा मुद्दा मांडण्यात आला. राज्याच्या तिजोरीवर ताण येऊ नये यासाठी बायबॅकची रक्कम केंद्र सरकारनेच करारात समाविष्ट करून घ्यावी, अशी विनंती करण्यात आली. त्यानंतर केंद्राने महाराष्ट्रातील 28 पैकी 10 प्रकल्प बायबॅक अंतर्गत घेण्यास तत्त्वतः सहमती दर्शविली असून त्याचा खर्च केंद्र उचलणार असल्याची माहिती आहे….
सध्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित संस्था यांच्यात बायबॅक रकमेबाबत चर्चा सुरू असून सुमारे 135 कोटी किंवा 103 कोटी रुपयांदरम्यान अंतिम आकडा निश्चित करण्याबाबत वाटाघाटी सुरू आहेत. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बुलढाणा शहर बायपास ते राजूर घाट या महत्त्वाच्या मार्गाच्या कामांना प्रत्यक्ष गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे…



