बुलढाणा ब्रेकिंग
*मोताळा तालुक्यात शेकडो अवैध विट भट्ट्या; प्रशासनाचे दुर्लक्ष…*
*धुरामुळे नागरिकांच्या आरोग्यावर संकट, तात्काळ कारवाईची मागणी..*
मोताळा तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून शेकडो अवैध विट भट्ट्या सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत असून तहसीलदार व जिल्हा प्रशासनाकडून पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. या भट्ट्यांमधून निघणाऱ्या धुरामुळे हजारो नागरिकांना श्वसनाचे आजार जडत असल्याचे सांगितले जात असून तात्काळ कारवाई करून भट्ट्या बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
तालुक्यातील अनेक भागांमध्ये प्रशासनाच्या नाकावर टिच्चून विट भट्ट्या सर्रास सुरू असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात मोजक्याच विट भट्ट्यांना प्रदूषण नियंत्रणाची अधिकृत परवानगी असल्याचे सांगितले जात असताना, मोताळा शहरालगत शेकडो भट्ट्या कोणतीही वैध परवानगी नसतानाही सुरू असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात स्थानिक व जिल्हा प्रशासनाची छुपी साथ असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली असून त्यामुळे संताप वाढत आहे.
विट भट्ट्यांतून होणाऱ्या धुरामुळे परिसरातील वातावरण प्रदूषित होत असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होत आहेत. विशेषतः लहान मुले, वृद्ध व आजारी व्यक्तींमध्ये दमा व इतर श्वसनाचे आजार वाढल्याची तक्रार नागरिक करत आहेत. नागरिकांच्या मते, आरोग्य धोक्यात घालून या भट्ट्या सुरू ठेवण्यात येत असल्याने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करणे गरजेचे आहे.
या संदर्भात तालुक्यातील नागरिकांनी तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत अवैध विट भट्ट्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच येत्या १५ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणात प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते व अवैध विट भट्ट्यांवर कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



