*भरतीसाठी उमेदवारांना दिलासा — आरोग्य, निवास व सुविधा सज्ज; बुलढाणा पोलिसांची नियोजनबद्ध तयारी…*

बुलढाणा
निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्हा पोलीस तर्फे सुरू असलेल्या पोलीस भरती-2026 प्रक्रियेत उमेदवारांना आरोग्य, निवास व इतर सुविधांबाबत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया बुलढाणा येथे सुरू असून नियोजनबद्ध पद्धतीने सर्व टप्पे पार पाडले जात आहेत.
जिल्हा पोलीस आस्थापनेवरील 148 पोलीस शिपाई व 14 चालक पोलीस शिपाई अशा एकूण 162 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 12 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत पोलीस कवायत मैदान तसेच पोलीस मुख्यालयात उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी घेतली जात आहे.
भरतीसाठी उपस्थित उमेदवारांच्या सोयीसाठी जिल्हा पोलीस दलाने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मैदानी चाचण्यांदरम्यान वैद्यकीय अधिकारी व स्टाफसह सुसज्ज रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आली असून आरोग्यविषयक बाबींवर त्वरित उपचार दिले जात आहेत. उमेदवारांना ORS पॅकेट, अल्पोपहारासाठी केळी तसेच पिण्याचे शुद्ध R.O. पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
बाहेरगावाहून आलेल्या उमेदवारांसाठी पोलीस सबसिडियरी कॅन्टीन, चिखली रोडवरील सुविधा तसेच पोलीस विश्रामगृह इमारतीत निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. पासपोर्ट फोटो सोबत न आणलेल्या उमेदवारांसाठी रंगीत फोटो काढणे व कागदपत्रांचे झेरॉक्स करण्याची सोय देखील करण्यात आली आहे.
भरती प्रक्रिया डिजिटल व ऑटोमेटेड पद्धतीने पार पाडली जात असून शारीरिक चाचणीचा निकाल उमेदवारांना त्याच दिवशी नोटीस बोर्डवर उपलब्ध करून दिला जात आहे. कागदपत्र पडताळणी व चाचणीदरम्यान उद्भवणाऱ्या तक्रारींसाठी तक्रार निवारण व अपील प्राधिकरण मैदानावर स्थापन करण्यात आले आहे. संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जात असून उमेदवारांना कोणी प्रलोभन किंवा आमिष दाखविल्यास तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या भरतीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पारदर्शक व सुरळीत प्रक्रिया राबविण्यावर भर देण्यात येत आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने उमेदवारांच्या आरोग्य, निवास व मूलभूत सोयींची विशेष काळजी घेतल्याने भरती प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.



