*शिवगायन स्पर्धेत स्वरविहारचा सुरेल जलवा; तृतीय क्रमांकाची मानाची पताका…*
बुलढाणा
छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बुलढाणा यांच्या वतीने आयोजित पोवाडा व शिवगायन स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत स्वरविहार संगीत विद्यालयाने आपल्या सुरेल सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकत तृतीय क्रमांक मिळवून मानाचा बहुमान पटकाविला.
दि. 14 फेब्रुवारी रोजी आयोजित या स्पर्धेत विविध गटांमधील स्पर्धकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. स्वरविहार संगीत विद्यालयाने खुल्या गटातून सहभाग नोंदवून छत्रपतींवरील गीत प्रभावीपणे सादर केले. त्यांच्या सादरीकरणातील ताल, सूर आणि समन्वय यामुळे परीक्षकांसह प्रेक्षकांकडूनही भरभरून दाद मिळाली.
या स्पर्धेत ज्योती खरे, वैशाली मोरे, शिल्पा डाबेराव, राजश्री उबाळे, प्रा. रत्नमाला जाधव व कल्पना ताडे यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाला डॉ. मिलिंद जाधव, अॅड. अमोल देशपांडे, शरदकुमार ठाकूर, अभय झनके, डॉ. मंजुष्री खोब्रागडे यांसह मान्यवरांची उपस्थिती लाभली. स्पर्धकांना साथसंगत म्हणून रविकिरण मोरे यांनी संवादिनीची तर शंतनु सरदार यांनी ढोलकीची साथ दिली.
विजयी स्पर्धकांना स्मृतिचिन्ह, रोख ११०० रुपये व प्रशस्तीपत्र देऊन दि. 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या शुभप्रसंगी सन्मानित करण्यात येणार आहे. स्वरविहार संगीत विद्यालयाचे संचालक प्रा. रविकिरण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने मिळविलेल्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.



