*बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला हजारो गावकऱ्यांचा जनआक्रोश मूक मोर्चा!*…
हद्दवाढ़ विरोधात पाच गावातील नागरिक आक्रमक…

जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरात बुलढाणा नगरपालिका हद्दवाढ प्रस्तावाच्या विरोधात गांवकरी जनआक्रोश मूक मोर्चात सागवन, सुंदरखेड, येळगाव, माळविहीर येथून आलेल्या हजारो गावकऱ्यांच्या प्रचंड जनसमुदयाने सर्वाचे लक्ष वेधले.
सदर मोर्चा हा शहरातून शांततेने मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत पोहचला.
गांवकरी जनआक्रोश मूक मोर्चाचे नेतृत्व गाव बचाव कृती समिती च्या माध्यमातून सर्वसामान्य गावकऱ्यांनी केले.
गाव बचाव कृती समितीच्या वतीने मोर्चातील सागवन, सुंदरखेड, माळविहिर, येळगाव येथून आलेल्या प्रत्येक गावच्या महिला प्रतिनिधी यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रधान सचिव, नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, महसूल मंत्री महाराष्ट्र शासन यांनीही त्यांच्या स्तरावरून उचित कार्यवाहीसाठी सादर करण्यात आले.
सदर निवेदना मध्ये असे म्हटले आहे की आम्ही खालील सही करणार बुलढाणा शहरातील जिजामाता प्रेक्षगार पासून जिल्हाधिकारी यांचे कार्यालयापर्यंत भव्य गांवकरी जनआक्रोश मूक मोर्चा काढून गाव बचाव कृती समितीच्या माध्यमातून बुलढाणा नगरपरिषद हद्दवाढ प्रस्ताव रद्द करण्यात यावा या मागणीसाठी खालील प्रमाणे निवेदन सादर करीत आहोत…
नगरपरिषद बुलढाणा यांनी दिनांक २१/१२/२०२० रोजी ठराव क्रमांक ३४ नुसार नगरपालिका हद्दीत वाढ करण्यात यावी आणि त्यात सागवन, जांभरून, येळगाव, सुंदरखेड, माळविहीर या गावांचा समावेश करण्यात यावा असा ठराव घेऊन संदर्भांकित हद्दवाढ प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचे मार्फत शासनास सादर केलेला आहे.
सदरहू अन्यायकारक प्रस्ताव तात्काळ रद्द करावा.
स्वतःच ठराव घेऊन स्वतःची हद्दवाढ करवून घेण्याचा कोणताही अधिकार नगरपरिषदेला नाही.
नगरपरिषद हद्दीत सामील व्हावे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार आमच्या जनतेचा, आमच्या ग्रामपंचायतचा आणि ग्रामसभेचा आहे.
नगरपरिषद हद्दीत सामील व्हायचे आहे किंवा नाही याबाबत मुख्याधिकारी यांनी ग्रामपंचायत सागवन, येळगाव, सुंदरखेड, माळविहीर ह्यांना ठराव मागितले होते. त्यानुसार वरील सर्व ग्रामपंचायत यांनी हद्दवाढ करण्यात येऊ नये, हद्दवाढ नामंजूर आहे असे ठराव दिलेले आहेत.
बुलढाणा नगर परिषदेची हद्दवाढ करावी त्यामध्ये आमचे गावाचा समावेश करावा अशी आमची जनतेची कोणतीही मागणी नव्हती व नाही.
सदर गावातील जनतेने नगरपालिकेकडे कोणत्याही नागरिक सुविधांची मागणी केलेली नाही.
वरील गावांमधील ग्रामपंचायत ही गावातील जनतेस नागरी सुविधा देण्यास सक्षम आहे.
हद्दवाढ प्रस्तावासोबत तहसीलदार बुलढाणा यांनी नागरी क्षेत्र व अकृषिक क्षेत्र तसेच अकृषक रोजदारीची टक्केवारी याबाबत कोणतीही चौकशी न करता चुकीचे अहवाल दिलेले आहेत.
असे असताना जिल्हाधिकारी व नगरपरिषदेने अगदी हुकुमशाही पद्धतीने नियमांचे उल्लंघन करून सदरचा हद्दवाढ प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे तो आम्हाला मान्य नाही.
सदरचा अन्यायकारक आणि आमच्या गावाच्या सार्वभौमत्वाला बाधा पोहचविणारा हद्द वाढ प्रस्ताव तात्काळ रद्द करण्यात यावा ही नम्र विनंती.
अशा प्रकारचा उल्लेख असलेल्या निवेदनावर गाव बचाव कृती समितीच्या वतीने डी एस लहाने, सतिश भाकरे पाटील, सुनील सोनुने, रवींद्र भाकरे, ॲड. दशरथसिंह राजपूत, नाना राजगुरे, गजानन इंगळे, अनिल कापसे, प्रकाश राजगुरे, श्रीकांत जाधव, राजेंद्र पवार, मंगलसिंग राजपूत, सारंग सुरुशे, संजय चव्हाण, सुभाष मिसाळ, रामेश्वर माळी, शीलाबाई आराख, महेश देवरे, रमण राजपूत, मो.अलीम, ॲड. मुकरम बागवान, मिलिंद जाधव शत्रुघ्न गडाख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



