रायपूर येथे डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना… आरोग्य विभाग
रायपूर येथील डेंग्यूसदृश परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
रायपूर येथे रुग्णांचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाल्याच्या अनुषंगाने आरोग्य विभाग आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, रायपूर यांनी गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या. यात दि. ७ जून, २६ जून, ११ जुलै, १९ जुलै, २१ जुलै आणि २२ जुलै या कालावधीमध्ये १० आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चमूने गावामध्ये जलद ताप सर्व्हेक्षण, किटकशास्त्रीय सर्व्हेक्षण राबविण्यात आले. यात ३१ रक्तजल नमुने डेंग्यू परिक्षणाकरीता घेण्यात आले. तसेच ४७२ घरामध्ये डासअळी आढळून आली. गावात ४ हजार ५७२ पाण्याची भांडी तपासणी करण्यात आली. यात ६८६ भांड्यामध्ये डासअळी आढळून आली. १५२ भांड्यामध्ये अळीनाशक टेमीफॉस टाकण्यात आले. ५३४ भांडी रिकामी करण्यात आली.
पाणीटंचाई असल्यामुळे नागरीकांची पाणी साठवून ठेवण्याची मानसिकता आहे. गावामध्ये नाल्या, गटारे पाण्याने तुंबलेली आढळून आल्याने ग्रामपंचायतीला पाणी वाहते करणे आणि कोरडा दिवस पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या. दि. २१ जुलै रोजी गावामध्ये धुरफवारणी करण्यात आली आहे. या प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचे १७ कर्मचारी आणि बुलडाणा तालुक्यातील १६ कर्मचारी आणि ४ आरोग्य निरीक्षकांनी सहभाग घेतला.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उस्मान शेख सदर सर्व्हेक्षणावर नियंत्रण ठेवत आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी रायपूर येथे प्रत्यक्ष भेट देवून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या. तसेच ग्रामपंचायत व सरपंचांना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत मार्गदर्शन केले. नागरिकांना आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे, घरातील पाणीसाठे स्वच्छ करणे, ताप आल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्याबाबत आवाहन केले. जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चौहाण यांनी भेटी देवून मार्गदर्शन आणि सुचना दिल्या आहेत.