परिचय मेळावे काळाची गरज -डॉ. अशोक खरात
मराठा समाज वधुवर परिचय मेळावा बैठक संपन्न
बुलढाणा : धावपळीच्या युगात पालकांना मुलामुलींचे विवाह जुळवताना अडचणी येत आहे. यासाठी वधूवर परिचय मेळावे आयोजित करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे सीईओ डॉ. अशोक खरात यांनी केले.
महाराष्ट्र मराठा सोयरिकचेवतीने ५ जानेवारी २०२५ रोजी बुलढाणा येथील गर्दे वाचनालयामध्ये संपन्न होणाऱ्या वधु वर परिचय मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित बैठकीत अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. नुकतीच चिखली रोड येथील मिसाळ यांच्या माऊली हाइट्समध्ये ही बैठक संपन्न झाली. बैठकीमध्ये बहुसंख्येने पालक वर्ग उपस्थित होता. नियोजित वधु वर परिचय मेळाव्याच्या प्रचार व प्रसाराच्या अनुषंगाने विचार विनिमय करण्यात आला. बैठकीमध्ये तालुका निहाय बैठका घेण्याचे ठरले. त्यानुसार पहिली बैठक दिनांक 22 डिसेंबरला परडा फाट्यावर प्रेमलता सोनवणे यांच्या शेतात झाली. तर दुसरी बैठक 29 डिसेंबरला चिखली येथे अशोकराव चौधरी यांच्या घरी घेण्याचे ठरले. इतर तालुक्यांच्या बैठका लवकरच जाहीर होणार आहेत.
पुढे बोलताना डॉ. अशोकराव खरात यांनी मराठा समाजासमोर असलेली आव्हाने व त्यावर उपाययोजना याचे विश्लेषण केले.आजमीतिला प्रत्येक गावांमध्ये जवळपास 100 मुले अशी आहेत की ज्यांची लग्न होतील की नाही अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. आजच अशी गंभीर परिस्थिती समाजासमोर असताना येणाऱ्या शंभर वर्षांमध्ये मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्यांकांच्या यादीत दिसेल की काय, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र मराठा सोयरीकचे संकल्पक सुनील जवंजाळ यांनी पालकांना मोठ्या संख्येत पाल्यांना सोबत घेऊन 5 जानेवारीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले .
बैठकीमध्ये मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्या बनवण्यात आल्या. बैठकीला महिला वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होता. महिला सोयरीक संघाच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती सुरेखा सावळे यांनी घराघरात जाऊन 5 जानेवारीला होणाऱ्या वधू वर परिचय मेळाव्याचा प्रचार व प्रसार करू व तसे नियोजन करू अशी ग्वाही दिली. मीनलताई आंबेकर म्हणाल्या की, पालकांनी अपेक्षांचे ओझे कमी केले तरच विवाह जुळून येण्यास मदत होणार आहे. मुलामुलींचे वाढत्या वयाला आळा बसवता येईल. डॉ संजीवनी शेळके यांनी विवाह चळवळीतील बारकाव्यांची विश्लेषण केले. सुनील सपकाळ यांनी समाजासमोरील आव्हानांचा पाढा वाचला. सामाजिक चळवळीतील सर्वात जटिल विषय हाती घेतल्याबद्दल सुनील जवंजाळ यांचे कौतुक केले. डॉ मनोहर तुपकर यांनी गावनिहाय समाज प्रबोधन बैठका घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. सर्वांनी मिळून मोठा ताकतीने मेळावा यशस्वी करू अशी सर्वांनी ग्वाही दिली. मोठ्या उत्साहात बैठक पार पडली.
बैठकीला नारायणराव मिसाळ, भगवानराव कानडजे, शिवाजीराव तायडे, श्रीकृष्ण जेउघाले, प्रा. गणेश कड, राहुल सावळे, गजाननराव पाटोळे, एड. विजय सावळे, डॉ.मधुकरराव देवकर, सुरेश देवकर, प्रभाकरराव काळवाघे, डॉ. शेषराव काळवाघे, प्रा. बालाजी शिंगणे, अनिता काळवाघे, डॉ. लता बाहेकर आदी मान्यवर उपस्थित होते. पुढील बैठक लवकरच होणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.