बुलढाणा
देऊळगावराजा तालुक्यामध्ये अवैध सावकाराचा धुमाकूळ
- आंदोलनाचा तिसरा दिवस, तरी प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष..
व्याजाने घेतलेल्या पैशासाठी सावकाराने शेतजमीन खरेदी करून घेतली. आता पैसे दिले तरी खरेदी पलटवून देण्यास नकार देत आहे. त्यामुळे सावकाराकडून शेतजमीन परत मिळविण्यासाठी एका शेतकरीपुत्राने देऊळगावराजा येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. आज, दि.२० फेब्रुवारी उपोषणाचा तिसरा दिवस आहे. याबाबत उपोषणकर्ते राहुल मधुकर कांबळे यांनी तहसीलदार आणि सहाय्यक निबंधक यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांचे आजोबा नामे शिवाजी किसन कांबळे राहणार तुळजापूर, तालुका देऊळगावराजा हे अशिक्षित आणि अंधत्वाने त्रस्त अल्पभूधारक शेतकरी होते. शेती करूनच आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असताना त्यांनी सन २००५ साली गोळेगाव येथील सावकार शिवाजी त्र्यंबक बर्डे व त्र्यंबक रंगनाथ बर्डे यांच्याकडून १२ हजार रुपये पाच टक्के व्याजदराने कर्ज घेतले होते. यासाठी त्यांनी त्यांच्या मालकीच्या गट नंबर १८३ मधील ०.४८ आर शेतजमीन अटक गहाण म्हणून नाममात्र खरेदी खत करून घेतले. कर्जाच्या परतफेडीनंतर खरेदीखत पलटवून देण्याचे ठरले असताना संबंधित सावकारांनी सदर शेतजमीन खरेदी खत पलटून दिली नाही. दरम्यान, घोडेगाव येथील सावकार शिवाजी बर्डे व त्र्यंबक बर्डे यांच्याकडे गहाण असलेल्या शेतजमिनीचे नाममात्र खरेदी खत पलटवून देण्याच्या मागणीसाठी राहुल मधुकर कांबळे यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही प्रशासनाचे कोणत्याही अधिकाऱ्याने संबंधित उपोषणाला भेट दिली नाही. आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी लोकशाही मार्गाने उपोषण तीव्र करण्याचा इशारा उपोषणकर्ते श्री कांबळे यांनी दिला आहे.