*शाई संपणारा पेन नव्हे*
*तो बोरुचा टाक आहे*
*बड्या बड्यांना ज्याचा धाक आहे*
*अशांतभाई वानखेडे बुलढाणा जिल्ह्याचे नाक आहे.*
प्रताप सिंग दादा बोदडे यांनी माझे कौतुक करण्यासाठी वरील प्रमाणे रचलेली चारोळी आजही स्मरणात आहे.

मुक्ताईनगर
कलावंतांनी चळवळीला समृद्ध केले. चळवळ मात्र अपेक्षेप्रमाणे कलावंतांना समृद्ध करू शकली नाही. आंबेडकरी चळवळ पोसणाऱ्या कलावंतांना समाज पोसू शकला नाही त्यामुळे आमचा आंबेडकरी कलावंत आज दारिद्र्यात खितपत पडला असल्याची वेदना मोठी आहे. असे असले तरी या कलावंतांनी बाबासाहेबांचा निळा झेंडा खांद्यावरून ढळू दिला नाही किती ही मजबूरी आली तरी स्वार्थासाठी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सोडला नाही. अनेक लोकांनी आमिषे दाखविली पण त्यावर लाथ मारून आमचा फाटका कलावंत आजही ताट मानेने उभा असल्याचे पाहून उर अभिमानाने भरून येतो. लोककवी वामनदादा कर्डक, प्रतापसिंग दादा बोदडे सारखी माणसे आमच्या समाजाचे वैभव,संपत्ती व भांडवल आहेत. प्रताप सिंग दादांचे मला भरपूर प्रेम मिळाले. ते प्रेमाने मला व्याही म्हणायचे ! ओघवती मधुर वाणी, प्रगल्भ विचारसरणी, अप्रतिम शब्दांची जुळवणी, अचाट कल्पनाशक्ती आंबेडकरी तत्त्वज्ञानाचा गाढा अभ्यास आणि शब्दांची जादूगिरी आदीं गुणांमुळे ते आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ठरलेत. त्यांनी उभ आयुष्य आंबेडकरी विचार धारेला वाहून घेतले त्यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी नागसेन दादा सावदेकर, कुणाल वराळे, राजाभाऊ शिरसाट, कुणाल बोदडे, प्रकाश वानखेडे, विजय वानखेडे, अजय देहाडे, प्रा किशोर वाघ सारखे कलावंत आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज म्हणून नावारूपाला येत आहेत या कलावंतांच्या सृजनशील विचारांनी, त्यांनी चालवलेल्या प्रचार आणि प्रसारांने आंबेडकरी चळवळीला नेहमीच झळाळी येत राहील. नागसेन दादांचा आज प्रतापसिंग दादांच्या जयंती निमित्त सत्कार करताना अभिमान वाटतो. नागसेन दादा सावदेकर आणि शाहीर डी आर इंगळे यांना महाराष्ट्र शासनाने पुरस्कृत करून त्यांचा बहुमान केला ही एक चांगली उपलब्धी आहे. सुषमादेवी सारखे कलावंत आज आर्थिक मदतीसाठी विवंचनेत गुजरान करीत आहेत. चळवळीने ज्या लोकांना समृद्ध केले त्यांनी आमच्या या कलावंतांकडे कधीच ढुंकून पाहिले नाही किंवा त्यांना मदतीचा हातही दिला नाही ही बाब मन विच्छन्न करणारी व आत्मचिंतनास प्रवृत्त करणारी आहे. कवीवैर्य प्रतापसिंग दादाच्या जयंतीच्या निमित्त दादांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन !

