*हर्षवर्धन सपकाळांसाठी ठाकरेंवर काँग्रेसने दबाव वाढविला!..*
*जिल्ह्यातील ११ तालुक्यातील काँग्रेस पदाधिकार्यांचे राजीनामे! बुलढाणा जिल्ह्यावर काँग्रेस पक्षातील मुकुल वासनिक यांचे वर्चस्व, वासनिकांच्या निर्णयाकडे लक्ष…!*
बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचा संभाव्य उमेदवार हा निवडून येण्याची क्षमता नसलेला आहे. त्यामुळे बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने ठाकरे गटावर जोरदार दबाव वाढविला आहे. रामटेक घ्या, पण बुलढाणा काँग्रेसला द्या, अशी मागणी काँग्रेसकडून होत आहे. बुलढाण्यातून माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी स्थानिक काँग्रेस नेते व पदाधिकारी हे करत असल्याच चित्र आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ११ तालुक्यातील पदाधिकार्यांनी आपले सामूहिक राजीनामे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्याकडे दिले असल्याने जिल्ह्यातिल् राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे .
राहुल बोंद्रे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची नाराजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना कळविली आहे. मात्र जिल्ह्यावर मुकुल वासनिक यांचे वर्चस्व असल्याने चेंडू वासनिक यांच्याकडे गेला आहे ते काय निर्णय घेतात याकडे जिल्ह्यातील काँग्रेसी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.. दरम्यान, बुलढाण्याची जागा उद्धव ठाकरे हे संभाजी ब्रिगेडला सोडण्याची शक्यता असून, त्यामुळेच ते आपला उमेदवार जाहीर करण्यास टाळाटाळ करत आहेत, अशी राजकीय सूत्रांची माहिती आहे. पुढील ४८ तासांत बुलढाण्याचा उमेदवार फायनल होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे .