*पिक विमा नुकसान भरपाईमध्ये पारदर्शकता ठेवावी
-केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव…*
बुलडाणा..
खरीप हंगामात पावसामुळे शेतपिकाचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना पिक विमा हा आधार असल्याने नुकसानीचे पंचनामे पारदर्शक पद्धतीने करावेत, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार संजय रायमूलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन, अतिरिक्त जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन आदी उपस्थित होते.
श्री. जाधव म्हणाले, खरीप हंगामात दोन वेळा अतिवृष्टी झाली आहे. यात 29 परिमंडळातील पिकांचे नुकसान झाले आहे. पुन्हा पेरणी किंवा इतर कामासाठी पिकविमा शेतकऱ्यांना आधार असल्यामुळे कृषी विभागाने पंचनामे विहित मुदतीत पूर्ण करावे. हे पंचनामे करीत असताना पारदर्शकता ठेवावी. शेतकरी मोठ्या संख्येने पिक विमा काढतात. मात्र त्याप्रमाणात शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे पंचनामे काळजीपूर्वक करावेत.
बियाणे किंवा खताबाबत तक्रारी झाल्यास शेतकऱ्यांना मदत होईल यासाठी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांनी दावा दाखल केल्यानंतर तातडीने प्रस्तावावर कारवाई करावी. बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देऊन दिलासा देण्यात यावा. तसेच नॅनो खतांचा चांगला फायदा होत असल्याने याबाबत जनजागृती करावी.
शेतकऱ्यांना पीक कर्ज हा आधार असल्याने बँकांनी पीक कर्ज देण्यासाठी सकारात्मक असावे. आतापर्यंत केवळ 35 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालेले आहे. 31 जुलैपर्यंत सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळेल, यासाठी बँकांनी प्रयत्न करावे. कर्जाची कागदपत्रे बँकेत सादर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना टोकन देण्यात यावे आणि प्रथम येणाऱ्या प्रथम कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
राज्य शासनाची माझी लाडकी बहिण यासाठी सर्व यंत्रणांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे. सुविधा . केंद्रांना आता प्रति अर्जामागे 50 रुपयांचा लाभ मिळणारा असल्याने त्यांच्याकडून प्राधान्याने अर्ज भरून घेण्यात यावे. तसेच युवकांसाठी युवा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याने उद्योग आणि युवकांची सांगड घालून योजना यशस्वी करावी.
महावितरणतर्फे कुसुम आणि पीएम सुर्यघर योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभ नागरिकांना आणि शेतकऱ्यांना होणार असल्याने या योजनेचे लाभ तातडीने देण्याची व्यवस्था करावी. यासोबतच श्री. जाधव यांनी आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, सार्वजनिक बांधकाम भारत संचार निगम लिमिटेड आणि आरोग्य विभागाचा आढावा घेतला. येत्या काळात राबविण्यात येणाऱ्या योजनांचा पाठपुरावा करून ही कामे तातडीने पूर्ण होईल, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.