मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाकडे शासकीय कर्मचाऱ्यांनी फिरवली पाठ
जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी विचारणार जाब ……….. सुनील जवंजाळ पाटील
बुलढाणा :
राज्यातील शासकीय कार्यालयात मोडी लिपीतील महत्वाचे अभिलेख आहेत. हे अभिलेख वाचण्यासाठी वाचक निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून तसेच भारतीय ऐतिहासिक कागदपत्र आयोगाच्या पुराभिलेख संचालनालयामार्फत ‘मोडी लिपी’ प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येतो. महसूल आणि अभिलेख विभागाशी सर्वाधिक संबंध येणाऱ्या या प्रशिक्षण शिबिराला शासकीय कर्मचाऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. एकूण ४४ विद्यार्थ्यांपैकी केवळ तीन शासकीय कर्मचारी यांनी स्वयंस्फूर्तीने या प्रशिक्षण वर्गात सहभाग घेतलेला आहे. याचा अर्थ असा की जिल्ह्यातील एकही कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेतलेला नाही. त्यामुळे सर्व सामान्य जनतेचे यामध्ये फार मोठे नुकसान होत आहे. ‘मोडी लिपी’मध्ये शासनाची तत्कालीन कागदपत्रे, कामकाज, पत्रव्यवहार, करार, अधिकारपत्रे आणि इतर महत्वाचे दस्तऐवज यांचा समावेश आहे. या कागदपत्रांमुळे माहिती, प्रशासन, सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था समजून घेण्यास मदत होते. जनतेचे पुरातन अभिलेख हे विविध शासकीय कार्यालयात आजही आढळून येतात. शासन स्तरावर त्यांचे वाचन करणारा एकही प्रशिक्षित कर्मचारी त्या त्या संबंधित कार्यालयाकडे नाही. करिता शासनाकडून वेळोवेळी महसूल विभाग निहाय अशा मोडीलिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येते. चालू आर्थिक वर्षात विदर्भातील अमरावती महसूल विभागातील बुलढाण्यात जिजामाता महाविद्यालयाला या प्रशिक्षण वर्गाच्या आयोजनाची संधी मिळाली असून हे दहा दिवसीय प्रशिक्षण 31 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत पार पडत आहे. यानंतर, प्रशिक्षणाच्या शेवटी म्हणजेच 10 ऑगस्ट रोजी परीक्षा असून ती उत्तीर्ण झाल्यावर शासनाकडून प्रमाणपत्र मिळते. यासंबंधी महाविद्यालयातील समन्वयकांनी विविध शासकीय कार्यालयाशी रितसर लिखित स्वरूपात संपर्क केला होता. तरीही शासनातर्फेच आयोजित प्रशिक्षण शिबिराला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवली! असेच म्हणावे लागत आहे.
याउलट मोडी लिपी जाणून घेण्यासाठी इच्छुक इतिहास प्रेमी नागरिकांचा उस्फुर्त सहभाग अधिक दिसून आल्याचे स्पष्ट होते. त्यात प्रामुख्याने मलकापूर येथील निवासी श्री नाजुकराव देशमुख वय वर्ष ७५ तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री सुनील जवंजाळ, साहित्यिक श्री सुरेश साबळे, सेवानिवृत्त प्राचार्य श्री बाळाजी शिंगने, ईतिहास प्राध्यापक श्रीकांत तळेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतलेला आहे. खऱ्या अर्थाने प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना या प्रशिक्षणाची गरज असून त्यांच्याकडून मिळणारा प्रतिसाद अत्यल्प आहे.

