*शेतकऱ्यांनी शेतीसोबत दुग्ध व शेतीपुरक व्यवसायाला चालना द्यावी- अॅड. निलेश हेलोडे पाटील*
विदर्भातील शेतकरी बांधव व सुशिक्षित बेरोजगार युवकांनी पारंपरिक पिकांसोबत दुग्ध व्यवसाय, रेशीम उद्योग आणि ग्रामपंचायत सार्वजनिक जमिनीवर चारा उत्पादन करून कुटुंबाच्या उत्पन्नात भर घालावी, असे आवाहन कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) अॅड. निलेश हेलोडे पाटील यांनी केले.
अॅड. निलेश हेलोडे पाटील हे दि.6 ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी कृषि, ग्रामविकास, पशुसंवर्धन व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुरक व्यवसाय वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, बेरोजगारी कमी करणे आणि शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी चालू असलेल्या योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर अॅड. हेलोडे पाटील यांनी संग्रामपूर तालुक्यातील बावनबिर, पातुर्डा आणि शेगाव तालुक्यातील पहुरपूर्णा व कठोरा गावांना भेट दिली. बावनबिर येथील आत्महत्या केलेल्या शेतकरी कै. सुमीत रविंद्र आकोटकर व पहुरपूर्णा येथील कै. दत्तात्रय रामेश्वर उमाळे यांच्या कुटुंबीयांना त्यांनी भेटून सांत्वन केले. आणि शासनाच्या योजनांद्वारे तातडीने मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
पातुर्डा येथे ज्वारी चारा लागवड, तर कठोरा येथे ग्रामपंचायत गट क्र. 76 व 77 वर सिताफळ, बांबू, लिंबू लागवड आणि पडीक जमिनीवरील नियोजित चारा प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. ग्रामस्थांना मग्रारोहयो अंतर्गत चारा लागवड करून पशुपालकांना मोफत चारा वाटप करण्याचे आवाहन त्यांनी केले.
शेतकऱ्यांनी केवळ नगदी पिकांवर अवलंबून न राहता तुती लागवड करून रेशीम उद्योग, तसेच दुग्ध व्यवसाय सुरू करून उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण करावेत. विदर्भात पश्चिम महाराष्ट्रासारखे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी दुग्ध व्यवसाय सुरू झाला पाहिजे, तेव्हाच आत्महत्या थांबतील आणि गावांचा सर्वांगीण विकास होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बावनबिर गावचे सरपंच गजानन मनसुटे, पातुर्डा, पहुरपूर्णा व कठोरा गावांचे सरपंच, संबंधित तालुक्यांचे तहसीलदार, कृषि अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, शासकीय अधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
000000

