जागतिक आदिवासी दिनानिमित्त लोणार तालुक्यात भव्य दुचाकी रॅली

लोणार – निसर्गाच्या सान्निध्यात राहणारा, निसर्गावर प्रेम करणारा आणि त्याचे संरक्षण, संवर्धन करणारा आदिवासी समाज शांतताप्रिय म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील आदिवासी जमाती निसर्गपूजा, प्राणीबळी, टस्क परंपरा, तसेच हिंदू धर्मातील सण-उत्सव साजरे करण्याची परंपरा पाळतात. जात पंचायत त्यांच्या सामाजिक जीवनावर नियंत्रण ठेवते तर विवाह संस्थेला विशेष महत्त्व असते.

अशा या समाजाला विकास प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या परंपरा, संस्कृती, हक्कांचे जतन करण्यासाठी दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी ‘जागतिक आदिवासी दिन’ साजरा केला जातो. यंदा या दिनानिमित्त बिरसा मुंडा क्रांती दलाचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष भगवान कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले.
सतत कोसळणाऱ्या पावसात रायगाव येथून रॅलीला सुरुवात झाली. रायगाव, नांद्रा, गोत्रा, टिटवी, दाभा, पहुर अशा आदिवासी गावांतून जाताना ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले. महिलांनी फुलांची उधळण केली तर ढोल-ताशांच्या गजरात वातावरण दणाणून गेले.
रॅलीतील सहभागी बांधवांसाठी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथे माजी सभापती संतोष मापारी यांच्या वतीने अल्पोपहार ठेवण्यात आला. त्यानंतर पंचायत समितीच्या आवारात रॅलीचा समारोप झाला.
समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना (शिंदे गट) जिल्हा प्रमुख प्रा. बळीराम मापारी होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार सिद्धार्थ खरात, तालुका प्रमुख भगवान पाटील सुलताने, शहर प्रमुख पांडुरंग सरकटे, उपशहर प्रमुख देवानंद चौधरी, माजी शहर प्रमुख सुधाकर मापारी, अशोक वारे उपस्थित होते.
रॅली यशस्वी करण्यासाठी केशव फुफाटे, शांताराम जटाळे, पंढरी धोंडू कोकाटे, तुकाराम तनपुरे, संतोष डवरे, विठ्ठल फुफाटे, राम घोगरे, गणेश राऊत, उद्धव पारधी, भिकाजी डाखोरे, समाधान मारकड यांसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. समारोप प्रसंगी मान्यवरांनी आदिवासी समाजाच्या हक्क व प्रगतीसाठी लढा सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.

