-3.9 C
New York
Tuesday, December 16, 2025

Buy now

spot_img

आमच्या हक्काचा पिकविमा व नुकसान भरपाई मेल्यावर देता का..? : रविकांत तुपकरांचा संतप्त सवाल

आमच्या हक्काचा पिकविमा व नुकसान भरपाई मेल्यावर देता का..? : रविकांत तुपकरांचा संतप्त सवाल

जिल्ह्यातील अडीच लाख शेतकरी पिक विम्यापासून वंचित; अतिवृष्टीचीही नुकसान भरपाई अत्यल्प.. १००% भरपाई द्या

रविकांत तुपकरांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट..

बुलढाणा, ता.१४ (प्रतिनिधी)
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर शासनाकडून सातत्याने अन्याय होत आहे. २०२४ मधील खरीप हंगामातील २ लाख ४४ हजार २६२ एवढे शेतकरी आजही पिक विमा पासून वंचित आहेत. तसेच हुमणी अळीमुळे झालेल्या नुकसानीचे आणि मेहकर व लोणार तालुक्यात ढगफुटीमुळे झालेल्या जमिनीच्या व पिकांच्या नुकसानीची कोणतीच मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही. जी मिळाली अत्यल्प आहे.. शेतकरी प्रचंड संकटात असून आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. वारंवार शासनाकडे मागणी करूनही मदत मिळत नाही, पिक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम आता आम्ही मेल्यावर देता का? असा संतप्त सवाल शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे. पिक विमा पासून वंचित शेतकऱ्यांना तात्काळ पिक विमा चा लाभ द्यावा तसेच हुमणी अळी व शेंडअळी मुळे झालेल्या नुकसानीची आणि अतिवृष्टीने झालेला नुकसानाची भरपाई तातडीने शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली असून या संदर्भातील निवेदन त्यांनी आज जिल्हाधिकारी यांना भेटून सादर केले.
शेतकऱ्यांचा वंचित पिक विमा तसेच इतर मदतीच्या बाबतीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी शिष्टमंडळासह आज 14 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी रविकांत तुपकर यांनी सांगितले की, काल दि. १३ ओगस्ट रोजी बुलढाणा जिल्ह्यातील ६६०७ शेतकऱ्यांना १४ कोटींचा पिकविमा मिळाला, पण यामध्ये अनेक शेतकऱ्यांना अत्यल्प रक्कम मिळाली. ही तोकडी मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार झाला आहे. त्यातच कहर म्हणजे २०२४ मधील खरीप हंगामातील २ लाख ४४ हजार २६२ एवढे शेतकरी पिकविम्या पासून आजही वंचित आहे. अनेक ठिकाणी नुकसान होऊनही शेतकऱ्यांचे दावे रिजेक्ट केले आहेत. एकाच गट नंबर व सर्वे नंबर मध्ये शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांचे सारखे नुकसान होऊन देखील नुकसान भरपाई मात्र एकाच शेतकऱ्याला मंजूर केली जाते. व नुकसान होऊनही शेजारच्या शेतकऱ्याचा दावा अपात्र ठरविला जातो. हा विमा कंपनीचा दुटप्पीपणा आहे. व दुर्दैव म्हणजे कृषी विभाग देखील कंपनीच्या या अजब कारभारात सहभागी आहे. त्यामुळे पिक विमा कंपनीवर कारवाई होणे गरजेचे झाले आहे त्यासाठी २०१४ सालापासून २०२४ पर्यंत राज्यभरात काम करणाऱ्या या कृषिविमा कंपन्यांचे टेस्ट ऑडीट झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पिकविम्या पासून वंचित असलेल्या जवळपास अडीच लाख शेतकऱ्यांना दुजाभाव न करता तात्काळ १०० % विमा भरपाई देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच हुमनी अळीने व शेंड अळीने लाखो सोयाबीन उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहे. सोयाबीन पिकाची वाढ खुंटली असून उत्पादनामध्ये प्रचंड घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हुमनी अळीने व शेंड अळीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करतांना दुजाभाव केला जात आहे, असा अन्याय न करता वस्तुनिष्ठ पंचनामे करून १०० % नुकसान भरपाई द्यावी,
दोन वेळा झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने मेहकर, लोणार, सिं. राजा, चिखली तालुक्यातील शेकडो गावांमध्ये मोठ्या प्रमाणात घरातील साहित्याचे, अन्नधान्याचे, शेती पिकांचे, शेतीचे, विहिरी, पाईपलाईन, तुषारसंचांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हे नुकसान भरपाई मिळणे देखील आवश्यक आहे. तसेच २५ व २६ जूनला झालेल्या नुकसानीपोटी खरडून गेलेल्या शेतीची जी मदत मिळाली ती अत्यल्प असून ‘त्या’ शेतीची पोटखराब म्हणून नोंद झाली आहे. जमीन पोटखराब असणाऱ्या शेतकऱ्यांना एकरी १८,८०० रुपये शासकीय मदत मिळणार आहे. मात्र ‘त्या’ शेतकऱ्यांच्या सातबारा वर पडीक जमिन म्हणून नोंद होणार आहे. पुढच्या वेळी त्या जमिनीत पीकपेरा दाखवता येणार नाही, बँकेचे पिककर्ज सुद्धा मिळणार नाही. जमिनीला पुन्हा वहीती करायचे झाल्यास लाखो रुपयाचा खर्च करावा लागणार आहे. पोट खराब वरून वहीती झाल्याची नोंद करण्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया अत्यंत किचकट आहे. त्यासाठी खूप हेलपाटे मारावे लागतात. ही प्रक्रिया अत्यंत सुलभ करावी व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १००% नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.
उपरोक्त मागण्यांच्या संदर्भात शासनाने गांभीर्यपूर्वक सकारात्मक विचार करावा अन्यथा अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा देखील रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या