*शेगावात ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे १४ सप्टेंबरला राज्यस्तरीय एकदिवसीय चिंतन शिबीर…..*
मंडल आयोग अहवालाची अंमलबजावणीची घोषणा तत्कालीन प्रधानमंत्री व्ही. पी. सिंग यांनी ७ ऑगस्ट १९९० रोजी केली होती. तसेच सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतीराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी केली होती. या दोन ऐतिहासिक दिवसांच्या स्मरणार्थ ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्यावतीने राज्य अधिवेशन व एक दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन येत्या १४ सप्टेंबर (रविवार) रोजी शेगाव येथील विघ्नहर्ता हॉटेल येथे करण्यात आले आहे, अशी माहिती संघटनेचे महासचिव राम वाडीभष्मे यांनी ७ सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी उपजिल्हाधिकारी सुनील शेळके भूषविणार आहेत. तर प्रमुख वक्ते म्हणून युनिटी ऑफ मुलनिवासी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष व ओबीसी अभ्यासक कमलाकांत (कुमार) काळे आणि जीएसटी विभागाचे माजी असिस्टंट कमिशनर व एससी, एसटी, ओबीसी कर्मचारी वेल्फेअर फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय थुल उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष पद संघटनेचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष किशोर पवार हे भूषविणार आहेत.
दरम्यान उद्धघाटकीय सत्रात ओबीसी समाजाचे अभ्यासक व लेखक कमलाकांत (कुमार) काळे हे ओबीसी आरक्षण : सामाजिक लढा व आताची परिस्थीती या विषयावर भाष्य करतील, तर माजी असिस्टंट कमिशनर संजय थुल हे अधिकारी व कर्मचारी यांच्या समोरील आव्हाने या विषयावर आपले विचार मांडतील. द्वितीय सत्रात निट, जेईई व स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. त्यानंतर सामूहिक चर्चा, ठराव व संघटनेची पुढील कार्यदिशा सुनिश्चित केली जाईल.
या अधिवेशनाला ओबीसी समाजातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष व संघटनेचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष किशोर पवार यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला संघटनेचे सल्लागार डॉ. शिवशंकर गोरे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटेखेडे, जिल्हा उपाध्यक्ष संजय ठाकरे, संतोष सातव, जिल्हा सहसंघटक सुधीर दाते, गजानन हुडेकर, तेजनकर, प्रमोद इंगळे, रमेश जुमळे, रामविजय ढोरे, शाम कौलकार, तुषार आसोलकर, संजय उमाळे, निळकंठ उचाडे, गजानन पडोळ, राजाभाऊ वायाळ, गणेश पऱ्हाड, संदीप शिंदे, नंदकिशोर खरात आदी पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
* मागील अधिवेशनाची थोडक्यात पार्श्वभूमी :
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ हे नेहमीच ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी, घटनात्मक अधिकारांच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायाच्या लढ्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. त्याच अनुषंगाने यावर्षीचे राज्य अधिवेशन शेगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. यापूर्वी २०२३ मध्ये संभाजीनगर (औरंगाबाद) येथे अधिवेशन झाले होते. त्यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक द्वितीय राष्ट्रीय मागासवर्ग (मंडल) आयोगाचे अध्यक्ष बी. पी. मंडल यांचे नातू प्रा. सुरज मंडल उपस्थित होते, तर प्रमुख वक्ते म्हणून ओबीसीचे अभ्यासक प्रा. प्रभाकर गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
त्यानंतर २०२४ मध्ये खारघर (नवी मुंबई) येथे अधिवेशन पार पडले. यावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक प्रा. कांचा इलैया यांनी उद्घाटन केले, तर संशोधक विद्यार्थी यशवंत झगडे आणि माजी आमदार डॉ. नारायणराव मुंडे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून आपले विचार मांडले. दोन्ही अधिवेशना दरम्यान विविध विषयांचे महत्वाचे ठराव सामुहीक व गट चर्चा करून संमत करण्यात आले, व त्यांची पुर्तता व्हावी याकरिता संघटनेच्यावतीने वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.

