*ग्रामीण विकासात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे मोलाचे योगदान*
– केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव यांचे गौरवोद्गार….
> केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या हस्ते आदर्श ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा गौरव
बुलढाणा,
देशाचे पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या विकसित राष्ट्राचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ग्रामीण भागाचा विकास होणे गरजेचे असून यात त्रिस्तरिय पंचायत राज व्यवस्थेसह ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे मोलाचे योगदान राहणार आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी आदर्श ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या गौरव सोहळ्यात काढले.
बुलढाण्यातील राधा गोविंद मंगल कार्यालयात केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित आदर्श ग्रामपंचायत अधिकारी गौरव सोहळा पार पडला. यावेळी त्यांच्या हस्ते आदर्श ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्याला मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम. मोहन, प्रकल्प संचालक (जळगाव) राजेश लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार, पी.एस. एंडोले, शिवशंकर भारसाकळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रकाश राठोड, समाज कल्याण अधिकारी अनिता राठोड, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष अशोक बुरकुल आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी संबोधित करतांना त्यांच्या कारकिर्दीतील अनुभव व ग्रामसेवकांचे कार्य विषद केले. ते म्हणाले की, गावपातळीवरचा विकास हा खऱ्या अर्थाने ग्रामसेवकाच्या माध्यमातून होतो. ग्रामीण भागाच्या विकास झपाट्याने करण्यासाठी ग्रामसेवकांवर मोठी जबाबदारी आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचा शहराकडील ओढा कमी करण्यासाठी ग्रामीण भागात शहरासारख्या सुविधा निर्माण होणे गरजेचे आहे. जोपर्यंत ग्रामीण भागाचा विकास होणार नाही तोपर्यंत भारत विकसित राष्ट्र झाला असे म्हणता येणार नाही. त्यामुळे २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र निर्माणासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यासह ग्रामपंचायत अधिकारी यांची मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी यावेळी केले.
ते पुढे म्हणाले की, नवीन व इतर ग्रामसेवकांना प्रोत्साहन देण्यासाठी आजच्या पुरस्कारार्थी आदर्श ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी ज्या गावात उत्कृष्ट काम केले आहे, त्या गावात एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करावी. यातून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळेल, अशी सूचना देखील त्यांनी यावेळी केली.
या सोहळ्यात केंद्रीय राज्यमंत्री ना. जाधव यांच्या हस्ते २०१७-१८ ते २०२३-२४ पर्यंतच्या ९० आदर्श ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देवून गौरव करण्यात आला.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री ना. जाधव यांच्या हस्ते समाज कल्याण विभागामार्फत मंजूर केलेल्या लाभार्थ्यांना ई-रिक्षाचे वितरण करण्यात आले. तसेच जिल्हा परिषदद्वारा निर्मित ‘विकासाची सुवर्णप्रभा’ या माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.
०००

