बुलढाणा ब्रेकिंग
जागतिक दर्जाच्या लोणार सरोवराकडे राज्य व केंद्र सरकारचे दुर्लक्ष!……
- इतिहासात प्रथमच सरोवरात मासे आढळल्याने तज्ज्ञांत खळबळ
जगातील दुर्मिळ उल्कापातातून निर्माण झालेले आणि खाऱ्या पाण्याचे अद्वितीय नैसर्गिक चमत्कार म्हणून ओळखले जाणारे लोणार सरोवर सध्या गंभीर पर्यावरणीय संकटाला सामोरे जात आहे. इतिहासात प्रथमच या सरोवरात मासे आढळल्याने वैज्ञानिक आणि पर्यावरणतज्ज्ञांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
तज्ज्ञांच्या मते, लोणार सरोवराचे पाणी नैसर्गिकरीत्या अत्यंत खारट (alkaline) आणि जैविकदृष्ट्या वेगळे असल्याने येथे माशांचे अस्तित्व शक्य नाही. मात्र अलीकडे स्थानिक नागरिकांनी सरोवराच्या काठावर मासे दिसल्याची नोंद केली असून, या घटनेमुळे सरोवरातील रासायनिक संतुलन बदलल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
स्थानिक पर्यावरणप्रेमी आणि संशोधकांनी या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. “सरोवरात बाहेरून येणाऱ्या गटारपाण्याचा आणि भूजलमिश्रणाचा परिणाम म्हणून खारटपणात घट होत आहे. यामुळे जैविक स्वरूपात मोठा बदल दिसत आहे,” असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
लोणार सरोवराला युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्यानंतरही राज्य व केंद्र सरकारकडून देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याची तीव्र भावना स्थानिक नागरिकांत आहे. “नैसर्गिक चमत्काराचा ऱ्हास सुरू आहे आणि प्रशासन अजूनही निष्क्रिय आहे,” असा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.
सदर प्रकरणाचा सखोल अभ्यास करण्यासाठी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ व भूविज्ञान विभागाने तत्काळ चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे

