बुलढाणा
*शेगाव येथे राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचा थाटात समारोप..
समारोप कार्यक्रमास राज्याचे क्रीडामंत्री माणिक कोकाटे, आमदार प्रवीण दरेकर तसेच केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती

शेगाव येथील राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचा आज उत्साहात व जल्लोषात समारोप झाला. या समारोप कार्यक्रमास राज्याचे क्रीडामंत्री माणिक कोकाटे, आमदार प्रवीण दरेकर तसेच केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
स्पर्धेच्या अंतिम दिवशी खेळाडूंमध्ये अंतिम लढती खेळविण्यात आल्या. अंतिम सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट तंत्र, ताकद व खेळभावना यांचे दर्शन घडवत प्रेक्षकांची मने जिंकली. चुरशीच्या व थरारक बॉक्सिंग लढतींमुळे संपूर्ण मैदानात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शन करत खेळातून शिस्त, संयम आणि आत्मविश्वास वाढतो, असे सांगितले. राज्यस्तरीय स्पर्धांमुळे ग्रामीण व नवोदित खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
समारोपप्रसंगी विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. शेगाव येथे पार पडलेल्या या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमुळे क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

