3.6 C
New York
Thursday, December 18, 2025

Buy now

spot_img

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निलंबन सत्राविरुद्ध ‘महसूल’ चा एल्गार!मुख्यमंत्री फडणवीसांना साकडे,…. महासंघाचे १९ पासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन

  • *बुलढाणा ब्रेकिंग*

    चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निलंबन सत्राविरुद्ध ‘महसूल’ चा एल्गार!मुख्यमंत्री फडणवीसांना साकडे,….
    महासंघाचे १९ पासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन

 

बुलढाणा: राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळात व बाहेर महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे महसूलचे अधिकारी व कर्मचारी दहशतीखाली काम करीत आहे. यामुळे अखेर महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महसूल मंत्री बावनकुळे यांच्याविरुद्ध एल्गार पुकारलाय ! विविध महसूल संघटनाचा समावेश असलेल्या समन्वय महासंघाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले असून त्यांच्यावरील कारवाईचा
अन्याय दूर करण्याची मागणी केली आहे…
नुसतीच मागणी न करता महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी कर्मचारी समन्वय महासंघाने येत्या १९ डिसेंबर पासून राज्यव्यापी कामबंद आंदोलनाची घोषणा केली आहे. यामुळे नजीकच्या काळात महसूल मंत्री बावनकुळे व महसूल विभागातील जाहीर संघर्ष पाहवयास मिळणार असल्याची चिन्हे आहेत आता धूर्त राजकारणी आणि चाणाक्ष मुख्यमंत्री समजले जाणारे देवेंद्र फडणवीस काही यशस्वी तोडगा काढतात काय याकडे राज्याच्या महसूल खात्यासह प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे
महासंघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनानुसार महसूल मंत्री मार्फत विधिमंडळात अधिकारी व कर्मचारी यांच्या विनाचौकशी होणाऱ्या निलंबनाच्या घोषणा तथा महसूल विभागाच्या दिर्घकालीन प्रलंबित असलेल्या आर्थिक व सेवा विषयक विविध मागण्यांचा निपटारा न झाल्यामुळे महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आणि दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.महसूल विभाग हा राज्याच्या प्रशासनाचा कणा म्हणून ओळखला जातो. महसूल विभागाद्वारा शासनाच्या अनेक महत्वाकांक्षी व जन कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येते. सर्वसामान्य जनतेशी संबंधित कामे व समस्यांसदर्भात महसूल विभाग कार्यरत असल्याने जनमानसात विभागाबाबत आदराची व आपुलकीची भावना आहे. तथापी, महसूल मंत्री महोदयांच्या मार्फत विधिमंडळात अधिकारी व कर्मचारी यांच्या होणाऱ्या एकतर्फी निलंबनांच्या घोषणामुळे व सर्वसामान्यांसमक्ष दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे जनमानसात महसूल विभागाची प्रतिमा खालावत आहे. तसेच महसूल अधिकारी व कर्मचारी यांना सातत्याने मानसिक तणावाखाली काम करावे लागत आहे….

*निलंबनाचे सत्र*
हिवाळी अधिवेशनात १२ डिसेंबर रोजी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना महसूल मंत्र्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता, कोणत्याही चौकशी समितीचा अहवाल नसताना, विधीमंडळाच्या सदस्यांने मागणी केलेली नसताना किंवा संबंधितांचे म्हणणे ऐकून न घेता ४ तहसीलदार, ४ मंडळ अधिकारी व २ ग्राम महसूल अधिकारी यांना निलंबित करण्याची घोषणा केली. यापाठोपाठ १३ डिसेंबर रोजी पवनी(, जि. भंडारा) येथील तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांचेही निलंबन व तत्कालीनतहसिलदाराविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे सभागृहात जाहीर करण्यात आले पालघर जिल्ह्यातील एक मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांनाही निलंबित करण्यात आले आहे.महसूल मंत्री यांच्या कार्यकाळात केवळ एका वर्षात महसूल अधिकारी व कर्मचा-यांचे विक्रमी संख्येने निलंबने झाली असून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जानेवारी २०२५ पासून आजपावेतो एकूण २८ नायब तहसिलदार व तहसिलदार, ४ उप जिल्हाधिकारी, ८महसूल मंडळ अधिकारी, १४ ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक महसूल अधिकारी व १ महसूल सहाय्यक यांना निलंबित करण्यात आले आहे….

*महसूल ची प्रतिमा मलीन*
सततच्या निलंबन सत्रामुळे अधिकारी व कर्मचारी हे प्रचंड तणावात असून दहशतीखाली काम करत आहेत. विविध लक्षवेधी प्रकरणांत इतर सर्व खात्याचे मंत्री महोदय त्यांचे अधिनस्त विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या वरील कारवाईबाबत चौकशी करुन निर्णय घेण्याबाबत भूमिका घेत आहे. केवळ महसूल मंत्री यांनी संबंधित आमदारांची मागणी नसतांना किंवा प्रकरणात अन्य तरतुदीद्वारे निर्णय घेणे न्यायोचित असतांना महसूल अधिकारी यांना कोणतीही संधी न देता एकतर्फी निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे सदर निलंबनाची कारवाईचे आदेश तत्काल प्रभावाने रद्द करण्यात यावेत अशी महासंघाची मुख्य मागणी आहे…

*आता मुख्यमंत्र्यवरच विश्वास*
त्यामुळे गाऱ्हाणे मांडण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी आता केवळ आपल्यावरच आमचा विश्वास असल्याचे महासंघाने म्हटले आहे.दरम्यान अन्याय सुरूच असल्याने महासंघाने पुणे महसूल विभागात सध्या सुरु असलेल्या कामकाज बंद च्या धर्तीवर १९ डिसेंबर पासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. महासंघात महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना, महाराष्ट्र राज्य तलाठी , विदर्भ पटवारी संघटना, विदर्भ मंडळ अधिकारी , विदर्भ कर्मचारी व महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना यांचा समावेश आहे.

*काय आहेत मागण्या?** निलंबन रद्द करणे, निलंबनाचे कार्यवाही बाबत आदर्श कार्यप्रणाली निश्चित करण्यात यावी,सुधारित ग्रेड पे व वेतन श्रेणी लागू करणे महसूल विभागातील नायब तहसिलदार यांचे ग्रेड पे, महसूल सहायक, ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, सहायक महसूल अधिकारी यांचे वेतन श्रेणीबाबत प्रलंबित प्रस्ताव मान्य करण्यात यावे,महसूल विभागाचे सर्व संवर्ग कार्यालयाचे सुधारित आकृतीबंध तात्काळ मंजूर करणे, खात्यांतर्गत परीक्षा घेणे, महसूल अधिकारी व कर्मचारी यांचेविरुध्द थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात येऊ नयेत.

Related Articles

ताज्या बातम्या