*अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक*
*पाच जिल्ह्यातील ८१ मतदान केंद्रावर २३ ऑक्टोबर रोजी होणार मतदान*
*मतदान केंद्रावर २४३ अधिकारी, कर्मचारी बजावणार कर्तव्य*
बुलढाणा
महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, यासाठी एकूण २६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी मतदारसंघात, विभागातील पाच जिल्ह्यांत ८१ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, ३५ हजार ८१० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी अमरावती विभागातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अमरावती विभागातील ५ जिल्ह्यातील ८१ मतदान केंद्रांवर जवळपास २४३ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ५३ अधिकारी, कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. सर्व मतदान केंद्रावर मतदारांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. मतदारांसाठी मतदानासंबंधीची सर्व माहिती मतदान केंद्राबाहेर उपलब्ध देण्यात आली आहे.
एका मतदान केंद्रावर ५ याप्रमाणे अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी आणि एक पोलीस कर्मचारी याप्रमाणे अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. सर्व मतदान केंद्राच्या प्रक्रियेचे ‘वेब कास्टींग’ करण्यात येत असून त्याद्वारे कामकाजावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. ८१ मतदान केंद्रासाठी २८ झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
*मतदार आपला हक्क बजावणार*
विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकुण मतदारांची संख्या ३५ हजार ८१० असून जिल्हानिहाय एकुण मतदारांची संख्या अनुक्रमे पुढील प्रमाणे आहे. अमरावती – १०,०९७, अकोला – ५,९४२, बुलढाणा – ९,१२४, वाशिम – ३,७१५ आणि यवतमाळ – ६,९३२ अशी मतदारांची संख्या आहे. तर जिल्हानिहाय एकुण मतदान केंद्रांची संख्या अनुक्रमे पुढील प्रमाणे आहे. अमरावती – २५, अकोला – १३, बुलढाणा – १८, वाशिम – ७ आणि यवतमाळ – १८ अशी एकुण ८१ केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.
निवडणुकीसाठी शुक्रवार २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार आहे. निवडणूकीसाठी मतदार असलेल्या शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विशेष नैमित्तिक रजा जाहीर करण्यात आली आहे. मात्र निवडणुकीकरीता मतदार असलेल्या खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या मतदारांना ही विशेष नैमित्तिक रजा लागू होत नाही. त्यामुळे अशा मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी ४ तासांची विशेष सवलत देण्याबाबत भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर मतदान कर्मचारी आणि मतपेट्या आणण्याकरीता व्यवस्था करण्यात आली असून त्याबाबत वाहतुक आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानूसार कार्यवाही केली जाणार आहे. लोकशाही भवन येथे स्थापन करण्यात आलेल्या ‘स्ट्राँग रुम’ मध्ये सर्व मतपेट्या कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात येणार आहेत.
मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरामध्ये सार्वजनिक किंवा खाजगी जागेत ध्वनीवर्धक, लाऊडस्पीकर किंवा अन्य उपकरणाचा वापर करण्यास, ते लावण्यास किंवा चालविण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात त्यांचे बुथ किंवा मंडप उभारता येणार नाहीत तसेच बेकायदेशीर जमाव करणे, प्रचार करणे किंवा मतदारांना अमिष दाखवून प्रभावित करण्यावर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये कडक प्रतिबंध जारी करण्यात आले आहेत.
या निवडणुकीच्या मतदानानंतर मंगळवार २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अमरावती येथील लोकशाही भवन येथे मतमोजणीची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावावा असे आवाहन अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी नयना गुंडे यांनी केले आहे.
०००००



