*विराट सभेमुळे जयश्रीताईंच्या विजयावर शिक्कामोर्तब…*
*मशालीच्या आगीत गद्दारांना भस्मसात करा — उद्धव ठाकरे*
*घाबरू नका …नकली दात घालणारा वाघही नकली – जयश्रीताई शेळके*
भगवा मावळ्यांच्या हाती शोभतो, दरोडेखोरांच्या नाही … 50 खोके त्यांना चिल्लर भासावेत अशी माया त्यांनी आता जमवली आहे. मात्र माझा महाराष्ट्र होरपळतोय, जनतेचे हाल होत असताना मिंधे सरकारने शिवरायांचा महाराष्ट्र गुजरात्यांच्या चरणी गघाण टाकलाय, हे महाराष्ट्र द्रोही सरकार घालवण्यासाठी मनामनात मशाल पेटवा आणि जयश्रीताई शेळके यांना विधानसभेत पाठवा. याच मशालीच्या आगीत गद्दारांना भस्मसात करायचे आहे. असा घणाघात शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज केला. तर वाघाचा नकली दात घालणारे त्यांचा पक्ष नकली आणि लोकही नकली आहे. शेर नही ..ये भेडीया है!असे सांगून जयश्रीताईंनी गाठ माझ्याशी आहे असा सज्जड दम यावेळी बोलतांना दिला.
महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांची विराट प्रचारसभा आज बुलढाणा येथील बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी समोरील मैदानावर पार पडली. गाव खेड्यातून लोटलेला जनसागर, कडवट व कट्टर शिवसैनिकांचे लोंढे,महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी आवळलेली वज्रमूठ पाहता आजची सभा गर्दीचा नवा उच्चांक प्रस्थापित करण्याबरोबर जयश्री ताईंच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारी ठरली. यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, मिलिंद नार्वेकर ,आमदार धीरज लिगाडे ,शिवसेना संपर्कप्रमुख नरुभाऊ खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत,माजी आमदार राहुल बोंद्रे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ ,रेखाताई खेडेकर , ध्रुपतराव सावळे ,छगन मेहेत्रे, संजय राठोड ,विजय अंभोरे, साहेबराव सरदार, दिलीप जाधव, सुनील सपकाळ, लखन गाडेकर, दत्ता काकस ,डी एस लहाने, संदीप दादा शेळके यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती लाभली.यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार व राज्य सरकार व सडकून टीका केली. ते पुढे म्हणाले – लोकसभेत आपला निसटता पराभव झाला. या गद्दाराला तर गाडायचं म्हणजे गाडायचंच आहे. तो नकली दाता सारखा गळून पडला पाहिजे. गेल्या वेळी मी उमेदवारी दिली ती चूक झाली. आता पुन्हा चूक करायची नाही.आता 50 खोके नॉट ओके … जयश्रीताईंना आपण सर्वजण ओळखतात. सोज्वळ व्यक्तिमत्व आहे. ताईंना आपल्याला निवडून द्यायचा आहे. अशुभ हातांनी काम केले तर अशुभच घडते. शिवरायांचा पुतळा देखील वाऱ्याने पडतो. यापेक्षा मोठी शोकांतिका काय असू शकते. जी सुरत महाराजांनी लुटले त्या सुरत मध्ये आपले सरकार आल्यावर शिवरायांचे मंदिर बांधायचे आहे. असे मी म्हटले की देवाभाऊंच्या (देवेंद्र फडणवीस)पोटात का दुखते. देवेंद्र आणि भाजप शिवद्रोही आहे. हे एक फुल दो हाप सरकार आणि गद्दारांना गाडण्यासाठी आमचा बारा बलुतेदार उभा राहिला आहे. या गद्दारांना एका पैशाचां देखील भाव देऊ नका. आमचे सरकार आल्यास मुलांना मोफत शिक्षण,व जुनी पेन्शन देण्याचा त्यांनी उच्चार केला. सर्वांना माफक दरात घरे मिळावी अशी इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना जीवनावश्यक वस्तूच्या किमती स्थिर ठेवल्या होत्या त्याच पद्धतीने पुन्हा ठेवल्या जातील असे सांगून त्यांनी जयश्री शेळके यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित श्रोत्यांनी हात उंचावून ठाकरेंच्या भूमिकेचे उत्स्फूर्त स्वागत केले.
*बुधवतांना आमदार करणारा हा शब्द आजच देतो*
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले – मी जालिंदर बुधवत यांना विधानसभेसाठी शब्द दिला होता. मात्र त्यांनी जयश्रीताईंच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे तुम्ही जयश्रीताईंना आमदार करा.. मी जालिंदर भाऊंना आमदार करण्याचा तुमच्या साक्षीने शब्द देतो असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
*विकास कामांचा पोकळ ढोल ढोल पिटणा-यांना वेशीवर जाब विचारा – जयश्रीताई शेळके*
बुलढाणा मतदारसंघात रोजगारांच्या हाताला काम नाही, उद्योगधंदे आणले नाही, साधा मोताळा एमआयडीसीचा प्रश्नही मार्गी लागला नाही, सिंचनाचा अभाव कायम आहे. मात्र विकास विकास असा ढोल पिटने सुरू आहे. हे सर्व ढोंग आहे. हे नकली लोक आहेत. मागील पंचवार्षिक मध्ये झालेले कामे सुद्धा स्वतःच्या नावावर बोर्ड लावून खपवत आहेत. ग्रामपंचायतीचे काम झाले तरी बोर्ड यांचाच लागतो. मतदारांना धमकावण्याचे काम करतात, स्वतः ची कामे सांगायला तोंड नाही आणि माझ्या परिवारावर आता उतरले आहे. पण लक्षात ठेवा गाठ माझ्याशी आहे. असे सांगून जयश्रीताई शेळके यांनी गद्दारांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी आमदार धीरज लिंगाडे ,काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ, राहुल बोंद्रे ,प्राध्यापक डी एस लहाने, रेखाताई खेडेकर, हजी रशीद खा जमादार , ध्रुपद्राव सावळे यांनी विचार मांडले. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना जयश्रीताई शेळके यांनी भक्ती शक्तीचे प्रतीमा भेट दिली. संचालन गजानन धांडे यांनी तर आभार प्रदर्शन सुनील सपकाळ यांनी केले. सभेसाठी जमलेली गर्दी व महाविकास आघाडीच्या नेत्यांचे मनोमिलन, दिसलेली वज्रमूठ पाहता आजची सभा जयश्रीताईंच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारी ठरली.