2.1 C
New York
Thursday, December 18, 2025

Buy now

spot_img

आडगाव राजा : इतिहास, श्रद्धा आणि पर्यटन विकासासाठी उजळतंय नवं 

आडगाव राजा : इतिहास, श्रद्धा आणि पर्यटन विकासासाठी उजळतंय नवं 

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात वसलेलं आडगाव राजा हे गाव सध्या 2500 लोकसंख्येसह झपाट्याने विकसित होत आहे. जनगणनेनुसार 1750 लोकसंख्या असलेल्या या गावात साक्षरतेचे प्रमाण तब्बल 90 टक्के आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे.

महाराष्ट्राची ओळख ही संतांची, पुण्यवंतांची, आणि पराक्रमी राजघराण्यांची भूमी म्हणून आहे. त्याच परंपरेत राष्ट्रमाता जिजाऊंचे वडील लखुजीराव जाधव हे देखील एक कर्तबगार, महापराक्रमी राजे होते. त्यांच्या जहागिरीतील पाच गावे — सिधखेड राजा, देऊळगाव राजा, मेहुना राजा, किनगाव राजा आणि आडगाव राजा — यामध्ये आडगाव राजा हे ऐतिहासिक वैभव जपणारे गाव ठरते.

सिंदखेड राजा येथून अवघ्या 13 किमी अंतरावर डोंगरदर्‍यांत वसलेले हे गाव, त्याच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या भक्कम किल्ल्यामुळे लक्ष वेधून घेतं. किल्ल्याभोवती भक्कम तटबंदी, बुरुज, भुयारी मार्ग, खोल भूईकोट खोल्या, झरोके व 150 फूट खोल दगडी विहीर या गोष्टी आजही त्या काळातील स्थापत्यकलेचं जिवंत उदाहरण देतात. या किल्ल्यातून मिळालेल्या पांचधातूच्या सात तोफा सध्या सिंदखेड राजा येथील संग्रहालयात प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.

किल्ल्याशेजारी असलेल्या तलावात कमळफुलांची शोभा असून पावसाअभावी येथे पाण्याची टंचाई जाणवते. तलावाचे सुशोभीकरण व गाळकाढीचे काम झाले तर शेतीसह पिण्याच्या पाण्याची समस्या मिटेल. त्याचप्रमाणे हा परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित होण्यास मदत होईल.

गावाच्या दक्षिणेस असलेले रेणुकादेवीचे हेमाडपंथी मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवरात्रात येथे नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होतात. चैत्र पौर्णिमेला होणारी यात्रा आणि देवीचे सोंग हा एक ऐतिहासिक सोहळा असतो.

सिंदखेडराजा समृद्धी महामार्ग टोल नाक्यापासून अवघ्या 14 किमी अंतरावर असलेले हे ठिकाण जर योग्य ते पायाभूत सुविधा आणि रस्ते सुविधा मिळाल्यास उत्तम पर्यटनस्थळ ठरू शकते. यामुळे येथे लघुउद्योग, रोजगाराच्या संधी, तसेच ग्रामीण युवकांसाठी नवे क्षितिज खुले होईल.

परंतु सध्या या भागातील रस्त्यांची अवस्था खराब असून एसटी बसेस अत्यल्प आहेत. त्यामुळे गावकरी, विद्यार्थी व वृद्धांना तालुक्याच्या ठिकाणी पोहचण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. शासनाने जर येथे रस्त्यांचे आणि वाहतुकीचे सक्षमीकरण केले, तर आडगाव राजा हे इतिहास, श्रद्धा आणि पर्यटनाचे संगमस्थळ म्हणून नक्कीच उदयाला येईल.

Related Articles

ताज्या बातम्या