- मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश धाब्यावर बसवले; पैनगंगाकाठच्या शेतकर्यांचा हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिरवला!
– येळगंगा धरणाचे स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले, नदीकाठच्या गावांत पूरस्थिती, शेतात पाणीचपाणी!
– शेतकरी नेते विनायक सरनाईक, नितीन राजपूत यांच्यासह शेतकर्यांचे पहाटेपासून आंदोलन सुरू; प्रशासनाला धारेवर धरले!

बुलढाणा – बुलढाणा तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस होत असल्याने बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणारे येळगाव धरण पूर्णक्षमतेने भरले आहे. त्यामुळे या धरणाचे स्वयंचलित गेट उघडले गेले असून, मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग पैनगंगा नदीत सुरू झाला. परिणामी, दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी नदीकाठच्या शेतकर्यांच्या शेतात पाणी शिरले असून, शेतीसह पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी या स्वयंचलित गेटप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक घेतली होती.त्या बैठकीत स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांना व जिल्हाधिकार्यांना स्वयंचलित गेटप्रणाली हटविण्याची सूचना केली होती.रविकांत तुपकर यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली होती.तसेच, क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांनीदेखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन याप्रश्नी त्यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. अजितदादांनीदेखील प्रशासनाला कार्यवाहीच्या सूचना केल्या होत्या. परंतु, नगरपरिषद व जिल्हाधिकारी यांनी काहीच कार्यवाही केली नसल्याने यंदा पुन्हा स्वयंचलित गेट उघडून पैनगंगेत मोठ्या प्रमाणात प्रवाह शिरल्याने नदीला महापूर येऊन नदीकाठच्या गावांसह शेतशिवारात पाणी शिरले आहे. त्यामुळे शेतीसह शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले असून, हातातोंडाशी आलेला घास प्रशासनाच्या नाकर्त्या धोरणामुळे हिरवला गेला आहे. त्यामुळे संतप्त झालेले शेतकरी विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांच्या नेतृत्वात आज पहाटेपासून सवणा येथे भरपाण्यात आंदोलनाला बसले असून, नदीकाठच्या गावांत संतापाची लाट उसळली आहे.

कालपासून बुलढाणा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू ्सल्याने अगोदरच शंभर टक्के भरलेल्या येळगाव धरणाचे गोडबोले स्वयंचलीत गेट एकाचवेळी खुले झाले आहेत. त्यामुळे बुलढाणा, चिखली तालुक्यातील पैनगंगा नदीकाठच्या शेतकर्यांच्या शेतामध्ये पाणीच पाणी तुंबले असून, शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून शेतकरी येळगाव धरणावरील सांडव्यातील स्वयंचलीत गेट मानवचलीत करण्यात यावे, धरणाला सांडवा करण्यात यावा, त्याचप्रमाणे सांडवा म्हणून किमान पाच गेट कायमस्वरूपी खुले ठेवण्यात यावे, जेणेकरून तलावातील पाण्याचा विसर्ग सुरू राहील, आणि एकाच वेळी स्वयंचलीत ८० दरवाजे खुलणार नाही. याबाबत चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी विद्यमान मुख्यमंत्री व तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक घेतली होती. या बैठकीत फडणवीस यांनी जिल्हाधिकारी व बुलढाणा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना कार्यवाहीचे निर्देशही दिले होते. तसेच, क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनीदेखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले होते. अजितदादांनी प्रशासनाला कार्यवाहीच्या सूचना केल्या होत्या. परंतु, प्रशासनाने या दोन्ही नेत्यांच्या सूचना अक्षरशः धाब्यावर बसविल्यात. त्यामुळे पुन्हा एकदा स्वयंचलित गेट उघडले झाले जावून पैनगंगाकाठी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.
विशेष म्हणजे, क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांनी येळगाव धरणाखालील शेतजमिनीचे व शेतीपिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी येळगाव धरणावरील स्वयंचलीत गेट काढून नैसर्गिक सांडवानिर्मिती करण्याची मागणी पैनगंगा नदीकाठच्या शेतजमीनधारक शेतकर्यांसह दि. १३/०५/२०२५ रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा व मुख्याधिकारी नगरपरिषद बुलढाणा यांच्याकडे केली होती. यावर तात्पुरता उपाय म्हणून गेट खुले ठेवल्यास पीक नुकसानीपासून वाचू शकते, या आधारावर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पुराच्या पाण्याचा धोका लक्षात घेता येळगाव धरणाचे ८० स्वयंचलीत गोडबोले गेट पैकी ०४ गेट उघडे ठेवण्याची दक्षता नगरपरिषद मार्फत घेण्यात येईल, असे लेखी पत्र मुख्याधिकारी नगरपरिषद बुलढाणा यांनी जिल्हा सहआयुक्त (न.वि.शा) जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांना दिले होते. मात्र लेखी दिलेले असतांनासुद्धा गेट खुले ठेवले नसल्याने ८० स्वयंचलीत गेटवर पाण्याचा दाब तयार होवून अनेक दरवाजे एकाचवेळी खुले झाल्याने नदीपात्रातील पाणी हे पैनगंगा नदीकाठच्या शेतकर्यांच्या शेतात घुसल्याने शेतकर्यांच्या शेतीपिकाचे नुकसान झाले आहे. या संपूर्ण नुकसानीस जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप विनायक सरनाईक यांच्यासह शेतकर्यांनी केला असून, तातडीने शंभर टक्के प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
विनायक सरनाईक, नितीन राजपूत यांचे शेतकर्यांसह पैनगंगा नदीकाठी आंदोलन
येळगाव धरणावर ८० स्वयंचलित दरवाजे बसविल्यापासून दरवर्षी पावसाळ्यात बुलढाणा, चिखली आणि मेहकर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरते. परिणामी, उभी पिके नष्ट होतात, तर शेतजमीनही खरडून जाते. या समस्येवर अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शेतकर्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे स्मरणपत्र देत केली होती. यावर चार गेट पावसाळ्यात कायमस्वरुपी खुले ठेवू जाणेकरून स्वयचंलीत गेटवर दाब येवून एकाचवेळी भिंत फुटल्यासम गेट खुलणार नाही व तलावात साठणार्या पाण्याचा विसर्ग सुरु राहील, असे आश्वासन नगरपरिषद बुलढाणा यांनी दिले होते. मात्र काल झालेल्या बुलढाणा येथील पावसामुळे येळगाव धरणावरील स्वयंचलीत गेटवर दाब निर्माण होवून एकाचवेळी अनेक गेट खुलल्याने मोठा पूर पैनगंगा नदीला येवून नदीकाठच्या शेतकर्यांचे मोठे नुकसान होऊन हाल सुरू आहेत. याबाबत नगरपरिषद बुलढाणा व जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाचे पालन केले नसल्याने व शेतकर्यांच्या मागणीची दखल न घेतल्यानेच शेतीपिकाचे नुकसान झाल्याचा आरोप शेतकर्यांसह क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांनी केला असून, शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने भल्यापहाटेच विनायक सरनाईक, नितीन राजपूत यांच्या नेतृत्वात शेतकर्यांनी आंदोलन सुरू केले आहे. यावेळी शेतकरी शिवाजी सांडू देवडे, मोजिन पिंजारी, प्रल्हाद देवडे, गणेश पुरुषोत्तम भोलाने, समीर जमदार, शरद शेळके, शेख जफर शेख रजक, फिरोज खान पठाण, शेख इस्माईल, शेख रफिक कलाल, प्रवीण कस्तुरे, शेख अन्सार शेख अझीझ, शेख अयाज शेख नजीर, शेख सत्तार शेख कादीर, शेख इसाक शेख शाफिर, शेख अशपाक शेख शाफिर, शिवनारायण पवार, समाधान सुरडकर, भगवान देवरे, दिलीप खेडेकर, शेख महेबुब शेख इस्माईल, प्रकाश पवार, अरूण कस्तुरे, आयुष शेळके, शेख शफीक कलाल, नामदेव सुरडकर, त्र्यंबक कस्तुरे, मदन शिरसाट, श्रीराम शेळके यांच्यासह शेतकरी आंदोलनात बसले आहेत. जोपर्यंत प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, अशी भूमिका शेतकर्यांनी घेतली आहे.

