*जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची नवी सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणा विकसित*
∆ नागरिकांना आपत्ती सतर्कतेच्या सूचना मिळणार
∆ ३३ पोलीस ठाण्यात यंत्रणा सुरू
बुलढाणा, दि. २८ : जिल्ह्यात आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांपर्यंत सूचना तत्काळ पोहोचवण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नवी सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणा विकसित केली आहे. या माध्यमातून आपत्ती, आपत्कालीन परिस्थिती किंवा महत्वाच्या सूचना मोठ्या प्रमाणावर जनतेपर्यंत पोहोचवता येणार आहेत.
ही उद्घोषणा यंत्रणा जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्ह्यातील ३३ पोलीस ठाण्यांमध्ये बसविण्यात आली असून तिच्या माध्यमातून सूचना थेट गावागावात पोहोचतील. तसेच जिल्हा आपत्ती उद्घोषणा यंत्रणेच्या 8634512201 या क्रमांकावरून आपत्ती संबंधित महत्वाचे व तातडीचे कॉल्स व संदेश दिले जाणार आहेत. नागरिकांना वेळेवर सतर्कतेच्या व सुरक्षेविषयी योग्य माहिती मिळाल्यास जीवित आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.
तसेच सर्व नागरिकांनी आपल्या मोबाईलवर बुलढाणा जिल्हा आपत्ती उद्घोषणा क्रमांक 8634512201 सेव्ह करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी या प्रणालीचा उपयोग करून सजग राहण्याचे आणि आपत्ती काळात प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
0000

