उपमुख्यमंत्र्यांनाही न्यायासाठी संघर्ष करावा लागतो? जयश्री शेळके यांचा सरकारवर घणाघात…
बुलढाणा
राज्यातील उपमुख्यमंत्री अपघातात मृत्युमुखी पडतात आणि त्यांच्या पत्नीला साधी एफआयआर दाखल करण्यासाठी संघर्ष करावा लागतो, ही परिस्थिती अत्यंत भयावह असल्याची टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या जयश्री सुनील शेळके यांनी केली आहे.
जयश्री शेळके म्हणाल्या की, स्वतः आमदार रोहित पवार तक्रार करत असतानाही संबंधित यंत्रणेकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. “उपमुख्यमंत्री अजितदादांनी लाखो लोकांना न्याय देण्याचे काम केले. आज त्यांनाच जर या व्यवस्थेकडून न्याय मिळत नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांचे काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्या पुढे म्हणाल्या की, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक बनली आहे. प्रभावशाली व्यक्तींनाही न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल, तर सामान्य नागरिकांची अवस्था किती बिकट असेल याचा विचार करण्याची गरज आहे.
शेळके यांनी प्रशासनावर टीका करत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. राज्य सरकारने या घटनेकडे गांभीर्याने पाहून तात्काळ योग्य पावले उचलावीत, अन्यथा जनतेचा विश्वास डळमळीत होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, विरोधकांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.



