19.3 C
New York
Saturday, April 18, 2026

Buy now

spot_img

अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा…बुलढाणा जिल्ह्यासाठी ३७ कोटी १५ लाखांचा भरीव निधी मंजूर*

*अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा…बुलढाणा जिल्ह्यासाठी ३७ कोटी १५ लाखांचा भरीव निधी मंजूर*

*मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची माहिती*

राज्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२५ आणि जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत झालेल्या अवेळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाने आता ५३ कोटी ७३ लाख ७ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यासाठी सर्वाधिक ३७ कोटी १५ लाख ५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून, मदतीचे वाटप थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

शासन निर्णयानुसार, बुलढाणा जिल्ह्यातील अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना नोव्हेंबर २०२५ चे नुकसानीसाठी ३७ हजार १४० बाधित शेतकऱ्यांसाठी ३०२०.२६ लक्ष रुपये तर जानेवारी २०२६ चे नुकसानीसाठी ७ हजार ३५७ बाधित शेतकऱ्यांसाठी ६९४.७९ लक्ष रुपये अशाप्रकारे जिल्ह्यासाठी एकूण ३७१५.०५ लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

*थेट लाभ हस्तांतरण (DBT):* मदतीचा निधी ‘डीबीटी’ पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. यासाठी लाभार्थ्यांची माहिती संगणकीय प्रणालीवर भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

*बँकांना वसुली करण्यास मनाई:* शासनाने स्पष्ट केले आहे की, नैसर्गिक आपत्तींतर्गत मिळालेली ही मदतीची रक्कम बँकांनी कोणत्याही जुन्या कर्ज खात्यात किंवा इतर वसुलीसाठी वळती करू नये. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात.

*दुबार मदत टाळणार:* एकाच हंगामात एकाच नुकसानीसाठी दोनदा मदत मिळणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहेत. मदत वाटपाची पारदर्शकता राखण्यासाठी लाभार्थ्यांची यादी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

*जिल्हा प्रशासनाकडून अंमलबजावणी:* शासकीय निर्णयानुसार, मदत कार्यसन-३ (म-११) यांनी या निधीचे नियोजन व वितरण करायचे आहे. नैसर्गिक आपत्तीसाठी विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करूनच हे वाटप केले जाणार आहे. निधी खर्च झाल्यानंतर त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र विभागीय आयुक्तांमार्फत शासनास सादर करण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून शासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदतीस मान्यता दिल्याने नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असल्याचेही मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितले….

Related Articles

ताज्या बातम्या