बुलढाणा ब्रेकिंग
*मूर्ती ग्रामपंचायतीतील रमाई नगर सिमेंट रस्ता कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह…*
*भ्रष्टाचाराच्या तक्रारीनंतर पंचायत समिती मोताळा ॲक्शन मोडवर; सात दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश…*
*मूर्तीतील रमाई नगर सिमेंट रस्ता कामाची चौकशी होणार; दोषींवर कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष..*
मोताळा तालुक्यातील मौजे मूर्ती येथील ग्रामपंचायती अंतर्गत रमाई नगर वस्तीतील सिमेंट रस्ता कामात कथित भ्रष्टाचार झाल्याची तसेच काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत पंचायत समिती मोताळा प्रशासनाने अखेर चौकशीचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे संबंधित कामाच्या गुणवत्तेची आणि तक्रारीतील आरोपांची चौकशी होणार आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकास योजनेंतर्गत सन २०२५-२६ मध्ये रमाई नगर वस्ती सिमेंट रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र, या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आणि काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संदीप पुंडलिक धुरंधर (रा. मूर्ती) यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी २४ ऑगस्ट २०२६ रोजी पंचायत समिती मोताळा येथे लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पंचायत समिती मोताळा कार्यालयाने २१ सप्टेंबर २०२६ रोजी जा.क्र. पंस मो/बांध/१०२/२०२६ अन्वये चौकशीचे आदेश जारी केले. या चौकशीसाठी विस्तार अधिकारी बी.एच. धंदर आणि शाखा अभियंता ए.आर. खोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश
नियुक्त चौकशी अधिकाऱ्यांनी तक्रारीतील सर्व मुद्द्यांची सखोल चौकशी करून सात दिवसांच्या आत स्पष्ट चौकशी अहवाल सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच चौकशीची तारीख आणि वेळ संबंधित ग्रामपंचायतीचे सचिव, सरपंच तसेच तक्रारदार यांना कळविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. दोषींवर कारवाई होणार का?
चौकशीचे आदेश निघाल्याने मूर्ती येथील ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मात्र, चौकशीत नेमके काय निष्पन्न होते, रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत कोणत्या त्रुटी आढळतात आणि तक्रारीतील आरोपांना पुष्टी मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चौकशी अहवालानंतर संबंधितांवर कारवाई होणार का, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. दरम्यान, गटविकास अधिकारी, पंचायत समिती मोताळा यांच्या स्वाक्षरीने हे आदेश जारी करण्यात आले आहेत. आता चौकशी पारदर्शकपणे होऊन वस्तुस्थिती समोर येण्याची आणि दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



