*बालगृहांच्या अचानक तपासणीत जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या बालकांच्या समस्या ;….
*बालकांना सुरक्षित, आनंदी व पोषक वातावरण उपलब्ध करून देण्याचे निर्देश…
बुलढाणा
बालकांचे हक्क, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी जिल्ह्यातील बालगृहांच्या अचानक तपासणी दौऱ्यांवर भर दिला आहे. या अनुषंगाने त्यांनी १४ ऑक्टोबर रोजी बुलढाणा येथील शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह, मुलींचे बालगृह तसेच विशेष दत्तक संस्था ‘दि लव्ह ट्रस्ट’ येथे भेट देऊन पाहणी केली.
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ च्या कलम ५४ अन्वये गठीत जिल्हास्तरीय तपासणी समितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी ११.३० वाजता शासकीय मुलांच्या निरीक्षणगृह व बालगृहाची अचानक तपासणी केली. यावेळी संस्थेतील सर्वसाधारण व्यवस्था, स्वयंपाकगृहाची स्थिती आणि बालकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी करण्यात आली. तसेच बालकांशी वैयक्तिक संवाद साधून त्यांच्या अडचणी, गरजा व अपेक्षा जाणून घेतल्या. यानंतर त्यांनी कनिष्ठ व वरिष्ठ मुलींच्या बालगृहाला भेट देऊन बालिकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेत बालगृहातील व्यवस्था आणि सुविधांचा आढावा घेतला.
बालगृहांमध्ये बालकांना सुरक्षित, आनंदी व पोषक वातावरण मिळणे आवश्यक असून, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बालकांच्या हक्कांचे संरक्षण, शिक्षण, आरोग्य, संगोपन आणि पुनर्वसन या बाबींवर विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
*दत्तक प्रक्रियेतील प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश :* जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष दत्तक संस्था ‘दि लव्ह ट्रस्ट’, बुलढाणा येथेही भेट देऊन संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. दत्तक प्रक्रियेतील प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. बालकांच्या हितासाठी संस्था करीत असलेल्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली.
बालकांच्या काळजी व संरक्षणाशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यास त्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन तातडीने कार्यवाही केली जाईल. यासाठी आपण २४ तास उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी नमूद केले. बालकांना सुरक्षित वातावरण, योग्य संगोपन आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे या भेटीतून अधोरेखित झाले.



