बुलढाणा
*बुलढाण्यात २५ ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव; भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन…*
*भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डी.एड. कॉलेज मैदानावर कार्यक्रम; अंजलीताई आंबेडकर, सुजातदादा आंबेडकर यांच्या उपस्थितीत होणार सोहळा, श्रद्धेय अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचे प्रमुख मार्गदर्शन*
धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून भारतीय बौद्ध महासभा, बुलढाणा जिल्हा (दक्षिण व उत्तर) यांच्या वतीने रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी बुलढाणा येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव व भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील त्रिशरण चौक परिसरातील डी.एड. कॉलेज मैदानावर सायंकाळी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
या धम्म मेळाव्याला राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर आणि युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे.
भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध तालुक्यांमध्ये भव्य धम्म मेळाव्यांचे आयोजन करण्याची परंपरा आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून तथागत गौतम बुद्धांचा शांती, समता, करुणा आणि बंधुतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
यंदाच्या धम्म मेळाव्याच्या आयोजनासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या बुलढाणा जिल्ह्यातील दक्षिण व उत्तर विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि धम्मप्रेमी नागरिक तयारीला लागले आहेत. जिल्ह्यातील विविध भागांतून बौद्ध अनुयायी व आंबेडकरी विचारांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, याच दिवशी रविवार, २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता बुलढाणा येथील जयस्तंभ चौकातून भव्य मिरवणुकीला सुरुवात होणार असल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आयोजित या सोहळ्यातून भगवान बुद्धांचा धम्म आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समताधिष्ठित विचार समाजापर्यंत पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक भारतीय बौद्ध महासभा, बुलढाणा जिल्हा (दक्षिण व उत्तर) यांच्या वतीने करण्यात आले आहे.



