4.1 C
New York
Tuesday, April 21, 2026

Buy now

spot_img

देऊळगावराजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीत बिनधास्त रेती उपसा;…* *पेयजल योजनेलाच धोका, प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप…*

बुलढाणा ब्रेकिंग

*देऊळगावराजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीत बिनधास्त रेती उपसा;…*

  • *पेयजल योजनेलाच धोका, प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप…*

देऊळगावराजा तालुक्यातील खडकपूर्णा नदी पात्रात रेती माफियाकडून सर्रास आणि बिनधास्त रेती उपसा सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. नारायण खेड – निमगाव गुरु परिसरातील रेती घाट पूर्णपणे अवैधरित्या सुरू असून शासनाने ठरवून दिलेल्या नियमांची पायमल्ली केली जात असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घाटाला जी अधिकृत हद्द देण्यात आली होती, त्या हद्दीबाहेर सुमारे एक किलोमीटर अंतरावर बोटीद्वारे रेती उपसा सुरू आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी उत्खनन सुरू आहे त्या परिसरात नारायण खेड व धोत्रा नंदई गावांच्या पेयजल योजनेची विहीर असून त्यामुळे पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

*बोगस बोटीद्वारे उत्खनन?*

नारायण खेड गावाजवळील घाटामध्ये बोगस बोट चालवून रेती काढली जात असल्याचा आरोप आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ज्या ठिकाणचा घाट मंजूर आहे त्या ठिकाणी उत्खनन न करता समोरच्या बाजूस मोठ्या प्रमाणावर वाळू काढली जात आहे. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचे सांगितले जात आहे.

*अधिकाऱ्यांवर राजकीय दबावाचा आरोप…*

गावातील तलाठी यांच्यावर राजकीय दबाव टाकला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि महसूल अधिकाऱ्यांनी अनधिकृत बोट पकडल्याची माहिती आहे. यावेळी देऊळगाव राजा येथील तहसील कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला असता, तहसीलदार वैशाली डोंगर जाळ यांनी संबंधित बोट बंद अवस्थेत असल्याचे सांगून त्या ठिकाणाहून निघून जाण्याचे व कोणतीही शासकीय कारवाई न करण्याचे निर्देश दिल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे….
तसेच ग्राम महसूल अधिकारी तांबे यांनाही तातडीने तेथून निघण्यास सांगण्यात आल्याचे समजते. या संपूर्ण प्रकरणामागे आर्थिक व्यवहार आणि राजकीय दबाव असल्याची शंका ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे…

*कारवाईची मागणी…*

खडकपूर्णा नदीतील बेकायदेशीर रेती उपसा तात्काळ थांबवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच पेयजल योजनेच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नारायण खेड व परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे….
दरम्यान, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात येणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे…

Related Articles

ताज्या बातम्या