मध्यपूर्वेत तणाव वाढला; भारत सरकारची सुरक्षा ॲडव्हायझरी — परदेशातील भारतीयांना सतर्क राहण्याचे आवाहन..
मुंबई / नवी दिल्ली
मध्यपूर्व आणि आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे. संबंधित देशांतील भारतीय दूतावासांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे, अनावश्यक हालचाली टाळण्याचे आणि स्थानिक प्रशासन तसेच दूतावासांच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
सद्यस्थितीत रामल्ला (पॅलेस्टाईन), दोहा (कतार), रियाध (सौदी अरेबिया), तेल अवीव (इस्रायल), तेहरान (इराण), बगदाद (इराक), कुवैत, बाहरीन, मस्कत (ओमान), जॉर्डन तसेच अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात) येथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांना विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र शासनाचेही आवाहन
महाराष्ट्र शासनाने देखील परदेशात वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे. अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ संबंधित भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य शासन केंद्र सरकार आणि संबंधित दूतावासांशी सतत समन्वय ठेवून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचेही सांगण्यात आले आहे.
२४x७ हेल्पलाईन सुरू
आपत्कालीन परिस्थितीत भारतीय नागरिकांनी संबंधित देशांतील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावा. दूतावास नियमितपणे परिस्थितीचे परीक्षण करत असून आवश्यक त्या सूचना वेळोवेळी जारी करत आहेत.
सरकारकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि अधिकृत माध्यमांवरूनच माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही परिस्थिती लक्षात घेता मध्यपूर्वेत वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांनी अत्यंत सतर्कता बाळगणे गरजेचे असून, आवश्यक असल्यास तातडीने भारतीय दूतावासांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने पुन्हा एकदा करण्यात आले आहे.



