18.2 C
New York
Saturday, April 18, 2026

Buy now

spot_img

“माझ्या जीवंतपणी न्याय द्या हो!” — लोणारच्या कर्करोगग्रस्त नागरिकाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे आर्त टाहो…

“माझ्या जीवंतपणी न्याय द्या हो!” — लोणारच्या कर्करोगग्रस्त नागरिकाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे आर्त टाहो…

लोणार (प्रतिनिधी):
“माझ्या जीवंतपणी मला न्याय मिळावा,” अशी आर्त विनंती करत लोणार येथील कर्करोगाने ग्रस्त असलेले कांतिलाल सुवालाल जोगड यांनी थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल विभागाकडे धाव घेतली आहे. नगर भुमापन क्रमांक ३३४ आणि ३३५ मधील क्षेत्रदुरुस्ती प्रकरण गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असल्याने त्यांनी शासन दरबारी न्यायाची मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण?
तक्रारदारांच्या अर्जानुसार, लोणार येथील नगर भुमापन क्रमांक ३३४ व ३३५ चा नझुल सर्व्हे करताना शासकीय कर्मचाऱ्यांकडून चूक झाली. ३३४ मधील काही क्षेत्र ३३५ मध्ये दाखविले गेले. ही बाब लक्षात आल्यानंतर कांतिलाल जोगड व शेजारी मंगलचंद आदिनाथ संगवई यांनी सर्व कागदोपत्री पुराव्यानिशी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १०६ नुसार २०१५ साली जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे अपील दाखल केले.
सदर अपीलची सत्यता पडताळणी करण्यासाठी प्रकरण जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख बुलढाणा यांच्या मार्फत उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय लोणार येथे पाठविण्यात आले.
तेथे दोन्ही अर्जदारांना शासकीय मोजणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आवश्यक शुल्क भरून अधिकृत मोजणी करण्यात आली. स्थळ निरीक्षण, पंचनामा आणि कायदेशीर जबाब नोंदवून प्रकरण अंतिम निर्णयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात परत पाठविण्यात येईल, असे सांगण्यात आले.
प्रकरणच पाठविले गेले नाही?
मात्र, अर्जदारांनी वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित अपील प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविलेच गेले नसल्याचे समोर आले. दरम्यान, संबंधित विभागातील काही कर्मचाऱ्यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या रेकॉर्ड हस्तांतरण यादीत हे प्रकरणच नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अर्जदारांच्या मनात गंभीर शंका निर्माण झाली आहे.
आधीही एक प्रकरण प्रलंबितच
याच प्रकारचे क्षेत्रदुरुस्ती अपील लोणार येथील दिवंगत कांतिलाल मुथा यांनी २०१० साली सर्व पुराव्यांसह दाखल केले होते. शासकीय मोजणी होऊनही ते प्रकरण निकाला विना कार्यालयातच पडून राहिले. अखेर २३ एप्रिल २०२१ रोजी त्यांचे निधन झाले; तरीही त्यांच्या वारसांना आजपर्यंत न्याय मिळालेला नाही.
हीच परिस्थिती आपल्यावर ओढवू नये, अशी भीती कर्करोगाने ग्रस्त असलेल्या जोगड यांनी व्यक्त केली आहे.
थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव
कांतिलाल जोगड यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, पालकमंत्री, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव तसेच आमदार सिद्धार्थ खरात यांच्यासह महसूल व भूमि अभिलेख विभागातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या अर्जाच्या प्रती स्पीड पोस्टद्वारे पाठवून न्यायाची मागणी केली आहे.
“माझ्या जीवंतपणी न्याय द्या,” असा भावनिक टाहो त्यांनी फोडला असून या गंभीर प्रकरणात शासन स्तरावर कोणती ठोस कारवाई होणार, याकडे लोणारकरांचे लक्ष लागले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या अपील प्रकरणात संबंधित विभाग जबाबदारी निश्चित करून निर्णय देणार का? आणि आजारी अर्जदाराला न्याय मिळणार का? असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या