बुलढाणा
*बुलढाण्यात पोलीस स्मृती दिनानिमित्त शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान…*
*जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे व पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते कृतज्ञतापत्र आणि भेटवस्तू प्रदान; शहीद जवानांच्या सर्वोच्च बलिदानाला भावपूर्ण आदरांजली*
देशाच्या संरक्षणासाठी आणि जनतेच्या सुरक्षिततेसाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या पोलीस अधिकारी व जवानांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी २१ ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृती दिन साजरा करण्यात आला. बुलढाणा येथील पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात शहीद पोलीस अधिकारी व जवानांना मानवंदना देण्यात आली. तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करून त्यांच्या त्यागाप्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील शहीद पोलीस अधिकारी व जवानांच्या कुटुंबीयांना पोलीस महासंचालकांच्या स्वाक्षरीचे कृतज्ञतापत्र आणि भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.
शहीद जवानांना शोक सलामी देत भावपूर्ण आदरांजली
२१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाखमधील हॉट स्प्रिंग परिसरात भारताच्या सीमेचे रक्षण करताना केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) दहा जवानांना वीरमरण आले होते. या शूर जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून आदराने पाळला जातो.
बुलढाणा पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता पोलीस स्मृती दिनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी देशभरातील शहीद पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या नावांचे स्मरण करण्यात आले. त्यानंतर बंदुकीच्या तीन फैरी झाडून शोक सलामी देत शहीद जवानांना मानवंदना अर्पण करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून वीरमरण पत्करलेल्या जवानांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
शहीदांच्या कुटुंबीयांप्रति कृतज्ञता व्यक्त..
नक्षलविरोधी मोहिमा, दहशतवादविरोधी लढा, कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे संरक्षण करताना महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक शूर अधिकारी आणि जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यांच्या शौर्याचे स्मरण कायम राहावे, त्यांच्या बलिदानाचा गौरव व्हावा आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रति कृतज्ञता व्यक्त करता यावी, या उद्देशाने हा विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
यावेळी जिल्ह्यातील शहीद पोलीस निरीक्षक यादवराव सखाराम पवार (तत्कालीन नियुक्ती, बुलढाणा) आणि शहीद पोलीस अंमलदार पोलीस शिपाई क्रमांक ३६४१ सर्जेराव एकनाथ खार्डे (तत्कालीन नियुक्ती, गडचिरोली) यांच्या कुटुंबीयांना जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे आणि पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते पोलीस महासंचालकांच्या स्वाक्षरीचे कृतज्ञतापत्र व भेटवस्तू सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आल्या.
तसेच शहीद पोलीस अंमलदार पोलीस शिपाई क्रमांक ३५३४ राजू नारायण गायकवाड (तत्कालीन नियुक्ती, गडचिरोली) आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक क्रमांक ८४८ विष्णू खंडूजी दसरे (तत्कालीन नियुक्ती, बुलढाणा) यांच्या कुटुंबीयांनाही त्यांच्या मूळ गावी सन्मानित करण्यात आले. संबंधित कुटुंबीयांना मेहकर आणि लोणार पोलीस ठाण्यांच्या ठाणेदारांच्या हस्ते कृतज्ञतापत्र व भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) पदाचा प्रभार सांभाळणारे पोलीस निरीक्षक रवी राठोड यांच्यासह बुलढाणा पोलीस दलातील विविध अधिकारी, अंमलदार, मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
शौर्य, त्याग आणि कर्तव्यनिष्ठेचा गौरव
पोलीस स्मृती दिन हा केवळ शहीद जवानांच्या आठवणी जागविण्याचा दिवस नसून देशाच्या आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या पोलीस दलाच्या शौर्याला सलाम करण्याचा दिवस आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान करून त्यांच्या त्यागाची जाणीव समाजापर्यंत पोहोचविण्याचा आणि त्यांच्या पाठीशी कृतज्ञतेने उभे राहण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
देशसेवा करताना प्राणांचे बलिदान देणाऱ्या शूर पोलीस अधिकारी आणि जवानांचे योगदान सदैव स्मरणात राहील, अशा भावना या प्रसंगी व्यक्त करण्यात आल्या.



