बुलढाणा ब्रेकिंग
- *भाजपच्या पाच पदाधिकाऱ्यांचे राजीनामे ; शहरात भाजपला गळती…*
भाजपाच्या अंतर्गत गटबाजीचा फटका आता उघडपणे पक्षाला बसू लागला असून शहरातील भाजपच्या पाच पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्षांकडे आपले राजीनामे सादर केले आहेत. जिल्हा पातळीवरील नेतृत्वाच्या कथित हेकेखोर आणि एकतर्फी भूमिकेला कंटाळून हे राजीनामे दिल्याचा आरोप संबंधित पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
राजीनामे देणाऱ्यांमध्ये उदय देशपांडे, पद्मानाथ बाहेकर, अरविंद होंडे, वैभव इंगळे, उदय देशपांडे व आणखी एका पदाधिकाऱ्याचा समावेश आहे. या घटनेमुळे शहरातील भाजप संघटनेत खळबळ उडाली असून “भाजपला शहरात गळती लागली आहे” अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राजीनामा देताना पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट आरोप केला की, जिल्हा नेतृत्वाकडून सातत्याने दुर्लक्ष, अपमानास्पद वागणूक आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या मतांना किंमत न देण्याची भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे संघटनेत काम करणे अशक्य झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर भाजप शहराध्यक्ष मांडर बाहेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, “नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याबाबत संबंधित पदाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार होती. त्या कारवाईच्या भीतीपोटीच त्यांनी राजीनामे दिले आहेत. हा पक्षांतर्गत नाराजीचा प्रश्न नसून शिस्तभंगाची बाब आहे.”
शहराध्यक्षांच्या या स्पष्टीकरणानंतरही पक्षांतर्गत मतभेद उघड झाल्याचे स्पष्ट झाले असून आगामी काळात याचा भाजपच्या संघटनात्मक ताकदीवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



