बुलढाणा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाचा पाया झाला भक्कम — शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्या नेतृत्वामुळे शिक्षणाला नवी दिशा…

बुलढाणा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाचा पाया अधिक भक्कम होत असून यामागे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांचे सक्रिय, सक्षम व दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व महत्त्वाची भूमिका बजावत आहे. निर्णयक्षमता, कामातील शिस्त आणि क्षेत्राशी थेट संवाद या त्रिसूत्रीवर काम करत विकास पाटील यांनी प्राथमिक शिक्षण विभागात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढावी आणि शिक्षकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण व्हावी, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. दुर्गम व आदिवासी भागातील शाळांना भेटी देऊन ते प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेत आहेत. वर्गातील अध्यापन, विद्यार्थ्यांची उपस्थिती, शैक्षणिक प्रगती, पोषण आहार योजना, शाळेतील मूलभूत सुविधा यावर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक ते निर्णय तात्काळ घेतले जात आहेत.

विशेष म्हणजे, मागील सुमारे ७० वर्षांच्या इतिहासात जिल्ह्याला मिळालेले पहिले इतके सक्रिय आणि परिणामकारक प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून विकास पाटील यांची ओळख निर्माण होत आहे. केवळ कागदोपत्री काम न करता प्रत्यक्ष मैदानात उतरून ते काम करत असल्याने शिक्षक, मुख्याध्यापक, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल मोठा विश्वास निर्माण झाला आहे.
शिक्षणाचा दर्जा उंचावणे, गळती थांबवणे, मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करणे आणि शिक्षकांना आधुनिक शैक्षणिक पद्धतींबाबत प्रशिक्षण देणे यावर त्यांचा भर आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली असून निकालांमध्येही सुधारणा दिसून येत आहे.
विकास पाटील यांच्या नेतृत्वामुळे बुलढाणा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाला नवी दिशा मिळत असून भविष्यात जिल्हा शैक्षणिक प्रगतीचा आदर्श ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या कार्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत असून प्राथमिक शिक्षणाचा पाया अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.



