बुलढाणा ब्रेकिंग
- *सिंदखेडराजा येथे सापडलेली १२ व्या शतकातील शेषशाही विष्णू मूर्ती खोलीबंद; १२ जानेवारीपर्यंत दर्शन खुले न केल्यास आंदोलन — बुद्धू चौधरी यांचा इशारा…*
सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक उत्खननादरम्यान नुकतीच सापडलेली १२ व्या शतकातील शेषशाही काळातील भगवान विष्णू यांची दुर्मिळ मूर्ती सध्या खोलीत बंद ठेवण्यात आली आहे. या मूर्तीला भाविकांसाठी दर्शनास खुले करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत असून १२ जानेवारीपर्यंत मूर्ती दर्शनासाठी खुली न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते बुद्धू चौधरी यांनी दिला आहे.
सिंदखेडराजा येथील राजे लखुजीराव् जाधव यांच्या समाधी स्थळ परिसरात सुरू असलेल्या उत्खनन कार्यात ही प्राचीन मूर्ती आढळून आली. पुरातत्त्वीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची असलेली ही मूर्ती शेषशाही काळातील असल्याचे तज्ज्ञांचे प्राथमिक मत आहे. मात्र इतकी ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाची मूर्ती सध्या सर्वसामान्य भाविकांसाठी बंद खोलीत ठेवण्यात आली असल्याने भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे….या संदर्भात बोलताना बुद्धू चौधरी म्हणाले की, “ही मूर्ती केवळ पुरातत्त्वीय वारसा नसून ती जनतेची श्रद्धास्थान आहे. हजारो भाविक या मूर्तीचे दर्शन घेण्यास उत्सुक आहेत. मात्र प्रशासनाने ती मूर्ती खोलीबंद ठेवून लोकांच्या भावनांवर अन्याय केला आहे. १२ जानेवारीपूर्वी मूर्ती दर्शनासाठी खुली न केल्यास आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू.”….
स्थानिक नागरिक व भाविकांनीही प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, योग्य सुरक्षा व्यवस्था ठेवून मूर्ती सर्वांसाठी खुली करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. मूर्तीच्या संरक्षणासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे असले तरी दर्शनावर पूर्ण बंदी घालणे योग्य नसल्याचे मत भाविक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, प्रशासनाकडून या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. मात्र वाढत्या जनभावना आणि आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनावर दबाव वाढताना दिसत आहे.
१२ जानेवारीला जिजाऊ जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर भाविक सिंदखेडराजात दाखल होणार असल्याने, या मूर्तीचे दर्शन खुले झाल्यास भाविकांचा ओघ वाढण्याची शक्यता असून धार्मिक व सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आता प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे….



