सिंदखेडराजात जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त राजकीय-सामाजिक नेत्यांची मांदियाळी; राजवाडा भाविकांनी फुलून गेला
बुलढाणा | प्रतिनिधी
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यभरातून विविध पक्षांचे नेते, आमदार, माजी आमदार, खासदार, सामाजिक कार्यकर्ते आणि लाखो जिजाऊ भक्त सिंदखेडराजात दाखल झाले असून जिजाऊ जन्मस्थळ असलेला श्री लखुजीराजे जाधव राजवाडा भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.
आज सकाळपासूनच विविध मान्यवरांनी राजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी उपस्थिती लावली. उबाठा पक्षाच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके, आमदार मनोज कायंदे, माजी आमदार शशिकांत खेडेकर, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, नगराध्यक्ष सौरभ तायडे, खासदार तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि १३ वे वंशज राजे शिवाजी जाधव यांनी राजवाड्यात येऊन राष्ट्रमाता जिजाऊंचे दर्शन घेत अभिवादन केले.
दरम्यान थोड्याच वेळात पालकमंत्री मकरंद पाटील, सहपालकमंत्री संजय सावकारे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे तसेच कामगार मंत्री आकाश फुंडकर हे देखील सिंदखेडराजात दाखल होऊन जिजाऊ माता यांना अभिवादन करणार आहेत.
जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त संपूर्ण परिसर आकर्षक रोषणाईने सजविण्यात आला असून ठिकठिकाणी फलक, रांगोळ्या, भगवे ध्वज आणि स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. भाविकांसाठी दर्शन व्यवस्था, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षेची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
जिजाऊ माता या केवळ शिवरायांच्या माता नव्हत्या तर त्या संपूर्ण राष्ट्रासाठी आदर्श मातृशक्ती असल्याची भावना भाविकांमध्ये दिसून येत आहे. “जिजाऊंचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत” अशी भावना अनेक मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली.
एकीकडे धार्मिक श्रद्धा, दुसरीकडे सामाजिक प्रेरणा आणि तिसरीकडे राजकीय उपस्थिती — अशा त्रिवेणी संगमामुळे सिंदखेडराजा हे आज महाराष्ट्राच्या श्रद्धेचे आणि प्रेरणेचे केंद्र बनले आहे.



