बुलढाणा
*बुलढाण्यात राज्यस्तरीय पुस्तक परीक्षण स्पर्धेचे यशस्वी आयोजन…*
*राज्यभरातून शिक्षक-विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग…*

बुलढाणा येथे राज्यस्तरीय पुस्तक परीक्षण स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत राज्याच्या विविध जिल्ह्यांतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. वाचनसंस्कृतीला चालना देणाऱ्या या उपक्रमाला शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातून विशेष प्रतिसाद मिळाला.
या राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन बुलढाणा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचन, चिंतन व परीक्षण कौशल्य विकसित होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला DIET प्राचार्य भटकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अनिल अकाळ, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील, शिक्षणाधिकारी (योजना) वैशाली ठग, अधिव्याख्याता गायकवाड सर, डुकरे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध लेखिका व अभ्यासक डॉ. मंजुश्री खोब्रागडे उपस्थित होत्या. याशिवाय परीक्षक व साहित्यिक म्हणून रमेश घेवंदे, सुप्रसिद्ध साहित्यिक व “निशानी – डावा अंगठा” कार रमेश इंगळे उत्रादकर, साहित्यिक डोंगरदिवे, कुणाल पैठणकर, देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी विविध पुस्तकांवर अभ्यासपूर्ण, विचारप्रवर्तक परीक्षणे सादर केली. स्पर्धेमुळे वाचन संस्कृती, लेखन कौशल्य आणि समीक्षात्मक दृष्टीकोन विकसित होण्यास मोठी मदत होत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले असून, भविष्यात अशा अधिक साहित्यिक उपक्रमांचे आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.



