बुलढाणा
*भारत विद्यालयाच्या मुलींचा क्रिकेटमध्ये डबल धमाका…*
*एकाच आठवड्यात राज्यस्तरावर दुसरे अजिंक्यपद पटकावण्याचा पराक्रम…*
भारत विद्यालय, बुलढाणा येथील १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची आणि मेहनतीची मोहोर उमटवत राज्यस्तरावर अजिंक्यपद पटकावले आहे. नाशिक येथे दिनांक २२ व २३ जानेवारी रोजी पार पडलेल्या १९ वर्षांखालील मुलींच्या शालेय राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत भारत विद्यालयाच्या मुलींनी दणदणीत कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
विशेष म्हणजे, अवघ्या एकाच आठवड्यात या संघाने राज्यस्तरावर दुसरे अजिंक्यपद पटकावले असून, यापूर्वी गोंदिया येथे झालेल्या माँटेक्स बॉल क्रिकेट स्पर्धेतही या संघाने विजेतेपद मिळवले होते. या यशामुळे भारत विद्यालयाच्या क्रिकेट परंपरेला नवा आयाम मिळाला आहे.
नाशिक येथे झालेल्या स्पर्धेत भारत विद्यालयाच्या संघाने उपांत्य सामन्यात मुंबई विभागाचा पराभव केला, तर अंतिम सामन्यात पुणे विभागावर दणदणीत विजय मिळवत अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले. या संघाने यापूर्वीच चार वेगवेगळ्या क्रिकेट प्रकारांमध्ये राज्यस्तरावर पोहोचण्याचा पराक्रम केला असून, ही कामगिरी निश्चितच उल्लेखनीय ठरते.
स्पर्धेनंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात राज्यस्तरीय विजेतेपदाचा चषक कर्णधार प्रणिता उगले, उपकर्णधार ऋतुजा पंडित आणि प्रशिक्षक संजय देवल यांनी संपूर्ण संघासमवेत मीनाक्षी गिरी मॅडम यांच्या हस्ते स्वीकारला. संघातील सर्व खेळाडूंना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
हे यश भारत विद्यालयाचे पाचवे राज्यस्तरीय विजेतेपद ठरले असून, विशेष बाब म्हणजे यावर्षी भारत विद्यालयाचे सहा क्रिकेट संघ राज्यस्तरावर पोहोचले आहेत.
या ऐतिहासिक यशाबद्दल भारत विद्यालयाच्या अध्यक्षा डॉ. सीमा आगाशे, सचिव अंगद आगाशे, प्राचार्य प्रल्हाद गायकवाड, उपप्राचार्य मोहन घोंघटे, पर्यवेक्षक नवल गवई, तसेच प्रशिक्षक संजय देवल, सावरमल शर्मा, अरुण सौभागे, संदेश पाटील, रोहन शेटे, दिनेश गर्गे, अमोल बाळ यांनी संघाचे अभिनंदन केले.
तसेच जिल्हा क्रीडाधिकारी श्री. बाळकृष्ण महानकर, क्रीडाधिकारी श्री. संदीप केळे, श्री. मनोज श्रीवास आणि टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे श्री. गोवर्धन राठोड यांनीही खेळाडूंना शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले आहे.
१९ वर्षांखालील मुलींचा क्रिकेट संघ :
प्रणिता उगले (कर्णधार, यष्टीरक्षक),
ऋतुजा पंडित (उपकर्णधार),
राहीया खान पठाण, प्रगती लोखंडे, वेदिका गवळी, कृष्णाली देशपांडे, भाग्यश्री भामद्रे, सायली साखरे, सानिका लहाने, मृणाल पडोळसे, प्रतीक्षा खरे, सुजाता हिवाळे, स्नेहल सुरसे, तन्वी तायडे, ज्ञानेश्वरी ढोकळे, रिद्धी कोकाटे.
प्रशिक्षक : संजय देवल, सावरमल शर्मा, रोहन शेटे



