बुलढाणा
*आजारी बापासाठी अंधारात शेतात उतरलेला अल्पवयीन मुलगा;*
*संघर्ष का नेहमी शेतकऱ्याच्याच वाट्याला?**

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील साठेगाव शिवारात घडलेली एक घटना आज संपूर्ण शेतकरी वर्गाच्या वेदनेचे जिवंत वास्तव समोर आणत आहे.
२४ जानेवारी २०२६ रोजी रात्री साधारण ११ वाजताच्या सुमारास घडलेली ही घटना आज, २५ जानेवारी रोजी उजेडात आली असून, ती ऐकून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल अशी आहे.
साठेगाव येथील शेतकरी जनार्धन साहेबराव नागरे हे गंभीर आजारामुळे अंथरुणाला खिळले आहेत. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असताना अचानक आलेल्या आजाराने त्यांना काम करण्यास असमर्थ केले. अशा परिस्थितीत त्यांच्या अल्पवयीन मुलाने – चिरंजीव आदित्य जनार्धन नागरे (वय अंदाजे ११ ते १५ वर्षे) – वडिलांच्या जागी जबाबदारी उचलली.
आदित्य हा शिकण्याच्या वयातला मुलगा आहे. शाळेत जाऊन स्वप्न पाहायची, खेळायची, मित्रांसोबत भविष्य घडवायची ही त्याची वेळ. मात्र, नियतीने त्याच्या वाट्याला वही–पुस्तकांऐवजी शेतीची जबाबदारी टाकली आहे. वडिलांच्या आजारामुळे शिक्षण सांभाळत तो शेतीकडे लक्ष देतोय, हीच एका शेतकऱ्याच्या पोराची न बोललेली वेदना आहे.
२४ जानेवारी २०२६ हा ई-पीक पेरणी नोंदीचा शेवटचा दिवस होता. ही नोंद झाली नाही, तर भविष्यात नैसर्गिक आपत्ती आल्यास शासनाकडून कोणतीही मदत मिळणार नाही, हे या अल्पवयीन मुलालाही ठाऊक होते. त्यामुळे जीव मुठीत धरून, अंधारात, कोणतेही संरक्षण नसताना आदित्य रात्री अकरा वाजता शेतात उतरला.
गट क्रमांक १२५, १२८ आणि २१३ मधील गहू व हरभरा पिकांची ई-पीक पेरणी नोंद त्याने स्वतः केली. विशेष म्हणजे, या परिसरात काही दिवसांपूर्वी बिबट्याचा वावर असल्याची माहिती असतानाही, हा चिमुकला मुलगा भीतीवर मात करून शेतात गेला. हे धाडस नव्हते, तर व्यवस्थेने त्याच्यावर लादलेली मजबुरी होती.
आज, २५ जानेवारी २०२६ रोजी ई-पीक पेरणीची साईट पूर्णपणे बंद झाली असून, कोणतीही मुदतवाढ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जर त्या रात्री आदित्यने ही नोंद केली नसती, तर उद्या अतिवृष्टी, गारपीट किंवा अन्य आपत्ती आली असती, तर नागरे कुटुंबाला शासनाच्या मदतीपासून कायमचा वंचित राहावे लागले असते.
मग प्रश्न उरतो तो असा की –
अशा वेळी शेतकऱ्याने जायचं तरी कोणाकडे?
आदित्यने केलेली ती ई-पीक नोंद केवळ एक तांत्रिक प्रक्रिया नव्हती;
ती होती शेतकरी कुटुंबाच्या भविष्यासाठी केलेली शेवटची धडपड,
ती होती उद्याच्या आधारासाठी घेतलेली जीवघेणी जबाबदारी.
आज हा प्रश्न एका अल्पवयीन मुलाचा असला, तरी उद्या तो महाराष्ट्रातील हजारो शेतकरी कुटुंबांचा प्रश्न ठरू शकतो. याच पार्श्वभूमीवर परिसरातील शेतकरी ठामपणे मागणी करत आहेत की,
संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांची ई-पीक पेरणीची नोंद राज्य सरकारने स्वतः करावी,
जेणेकरून पुढे कोणत्याही शेतकऱ्याच्या पोराला
अंधारात, भीतीत आणि मजबुरीत
शिक्षणासोबत शेतीची जबाबदारी उचलावी लागू नये.
ही घटना केवळ एक बातमी नाही,
ती व्यवस्थेला आरसा दाखवणारी एक जिवंत हाक आहे



